कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय, खासगी रुग्णालयातील प्राणवायू प्रणालीची तपासणी करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हील अभियंते, तज्ज्ञ यांची विविध पथक निर्मिती करावी. या पथकांकडून जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी कोव्हीड रुग्णालयांतील प्राणवायू नलिकांची व प्रणालीची तपासणी करावी. सोबत इलेक्ट्रिकल, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडीटदेखील करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात आज बैठक झाली. या बैठकीला प्राचार्य प्रशांत पटलवार, आय. टी. आय.चे प्राचार्य रवींद्र मुंडासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपायुक्त निखील मोरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, तहसीलदार अर्चना कापसे आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, शासकीय तसेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतनमधील मनुष्यबळ उपलब्ध करुन त्यांची पथके बनवावीत. या पथकांकडून शासकीय तसेच खासगी सर्व कोव्हिड रुग्णालयातील प्राणवायू प्रणालीची तपासणी करावी. यात डी.सी.एच, डी.सी.एच.सी., सी.सी.सी. यांचाही समावेश असेल. ही तपासणी करतानाच कोणताही अपघात होणार नाही याची काळजी आणि दक्षता म्हणून सोबतच इलेक्ट्रिकल, स्ट्रक्चरल, आणि फायर ऑडीटही करावे. याबाबतचा अहवाल संबंधित रुग्णालयांना द्यावा.
गारगोटी आय.सी. आर.ई. चे प्राचार्य जयंत घेवडे, शिवाजी विद्यापीठ डी. ओ.टी.चे संचालक प्रा. जे.एस बागी, समन्वयक महेश साळुंखे उपस्थित होते.

Recent Posts