महाराष्ट्र खाकी ( जालना / विवेक जगताप ) – शिक्षण विभागाला लागले लाचखोरीचे ग्रहण, भ्रष्टाचाराची एक आणखी घृणास्पद घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय ५७) आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवस्ती येथील सहाय्यक शिक्षक जयगुरू शिवाजी गिरी (वय ५०) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार मुख्यध्यापक यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२६ मध्ये २.० शाळायुक्त वेतनप्रणाली ऑनलाइन देयकामध्ये अनियमितता केल्याबद्दल गट शिक्षण अधिकारी केंज यांनी चौकशी सुरू केली होती. चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या दत्तात्रय चाटे यांनी तक्रारदाराकडून ४०,००० रुपये लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे तक्रार दिली.
दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.४० वाजता केंज येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. दत्तात्रय चाटे यांनी ४०,००० रुपये स्वीकारले, तर जयगुरू गिरी यांनी तक्रारदाराकडून २०,००० रुपये घेतले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाणे केंज जिल्हा बीड येथे कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाली. सापळा पथकामध्ये पो.ह. गजानन घायवट, पोअं. मनोहर भुतेकर, पोअं. गणेश चेके आणि चा.पो.ना. विठ्ठल कापसे यांचा समावेश होता. हि कारवाई माधुरी केदार कांगणे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि शशिकांत सिंगारे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनात झाली.




