लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी थेट जिल्हा क्रीडा संकुल येथे जावून तेथील सुविधांचा आढावा घेतला. याठिकाणी येणारे खेळाडू, नागरिकांना विविध सुविधा क्रीडा उपलब्ध करून देण्यासह परिसराची स्वच्छता आदी बाबींविषयी त्यांनी सूचना दिल्या. तसेच याठिकाणी असलेल्या काही  गाळेधारकांकडे गेल्या काही महिन्याचे भाडे थकीत असून त्यांनी ते लवकरात लवकर भरून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्यासह क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, संकुलातील गाळेधारक, पोलीस प्रशिक्षण संस्थांचे संचालक यावेळी उपस्थित होते. लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी व सायंकाळी येणाऱ्या नागरिकांची,

खेळाडूंची संख्या जास्त आहे. त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे, संकुलाची स्वच्छता राखणे यासाठी जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. या सोबतच येथील गाळे धारकयांनीही आपल्या दुकानासमोरील परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी. प्रत्येक दुकाना बाहेर कचराकुंडी ठेवून नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करणारे फलक लावावेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाची

देखभाल करण्यासाठी येथील गाळेधारकांकडून मिळणारे उत्पन्न महत्वाचा स्त्रोत आहे. त्यामुळे सर्व गाळेधारकांनी आपल्याकडील थकीत भाडे लवकरात लवकर भरण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या मुलांना प्रवेशाची वेळ निश्चित करून द्यावी. तसेच याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, कोणतीही गैरकृती होणार नाही, याबाबाबत जागोजागी सूचना फलक लावावेत. धावणे आणि चालणे यासाठी स्वतंत्र धावपट्टी असून त्यानुसार संबंधितांना सूचना दिल्या जाव्यात, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. यावेळी उपस्थित गाळेधारक, नागरिक, खेळाडू यांच्याशीही त्यांनी संवाद साधला, तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Recent Posts