महाराष्ट्र खाकी (बीड / विवेक जगताप) – मी सरकारमध्ये असलो तरी सरकारला सांगू इच्छितो की, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर भविष्यात लातूर, जालना, धाराशिव असं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघतील. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय
मोर्चाचं आयोजन करण्यात आला होता. या मोर्चात तसंच यावेळी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि जवळचे असलेले आमदार अभिमन्यू पवार यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे. “ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं गेलं, महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी क्रूरता कधी ऐकायला, वाचायला मिळाली नव्हती, इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं गेलं. तितक्याच क्रूरपणे आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय
आम्ही शांत बसणार नाही, हे तुम्हाला सांगायला आज आम्ही आलो आहोत. हा आक्रोश फक्त बीड जिल्ह्याचा नाही. हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जनतेचा आहे. मी सरकारमध्ये असलो तरी सरकारला सांगू इच्छितो की, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर भविष्यात लातूर, जालना, धाराशिव असं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघतील. जसे कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभर मोर्चे निघाले, तसे मोर्चे
आताही निघतील, असा इशारा सरकारला आमदार पवार या निमित्ताने देत आहे,” अशी आक्रमक भूमिका आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडली आहे. “संतोष देशमुख यांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सगळे आमदार बीड जिल्ह्यातील जनतेसोबत आहोत. तुम्हाला माहीत असेल की, आम्ही विधानसभेत आवाज उठवला आहे, रस्त्यावरही आवाज उठवत आहोत, पुढेही रस्त्यावर येऊ, तुम्ही काही काळजी करू नका. हा मोर्चा कोणा
पक्षाचा, जातीचा किंवा धर्माचा नाही, तर बीड जिल्ह्यातील आक्रोशित आणि पीडित जनतेचा मोर्चा आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लातूरमधून बीडमध्ये या मोर्चासाठी आलो आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी कोणीही असो, कितीही मोठा असो, वाल्मिक कराडही असो त्याला अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर आम्ही लातूरमध्येही असा मोर्चा काढू, असं आश्वासन मी तुम्हाला देत आहे,” असा शब्द यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी बीड जिल्हावासीयांना दिला आहे.