महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – राज्याचे नवनियुक्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले. यानिमित्त सांगवी फाटा येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देवून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे स्वागत केले.
पोलीस उपअधीक्षक मनीष कल्याणकर, अहमदपूरचे गट विकास अधिकारी ए. डी. अंदेलवाड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील भक्तिस्थळ येथे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले. तसेच शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा.
सावरकर पुतळा व महात्मा बसवेश्वर चौक येथे अभिवादन केले. तसेच भारतीय राज्यघटनेची उद्देशिका आणि स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण केले. अहमदपूर नगरपरिषदेच्यावतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विविध संघटना, पदाधिकारी यांनीही बाबासाहेब पाटील यांचा यावेळी सत्कार केला. राज्य मंत्रिमंडळामध्ये मिळालेली सहकार मंत्री पदाची जबाबदारी महत्त्वाची असून या
माध्यमातून सहकार चळवळीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले. सहकार क्षेत्राचा राज्याच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संस्थांना येणाऱ्या समस्या सोडवून सहकार चळवळ वृद्धिंगत करण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.