महाराष्ट्र खाकी ( नांदेड / प्रतिनिधी ) – नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुण्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नांदेडचे हे पद अवनवत करुन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र कार्यकाळ पूर्ण न झाल्यामुळे महावरकर यांनी कॅटमध्ये अर्ज केला. या
अर्जावर कॅटने 19 जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. दरम्यान शहाजी उमाप हे शुक्रवारी नांदेडमध्ये दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी पदभार स्विकारला नव्हता. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी 31 जानेवारी रोजी बढती मिळालेल्या पोलीस उपमहानिरीक्षक
शहाजी उमाप यांची मुंबईवरुन बदलीचे आदेश नुकतेच निघाले होते. पोलीस उपमहानिरीक्षक पदावर असलेल्या शशिकांत महावरकर यांनी 2 मार्च 2023 रोजी पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नांदेड परिक्षेत्राचा पदभारी स्वीकारला होता. त्यानंतर 24 एप्रिल 2023 रोजी त्यांना बढती मिळाली आणि ते विशेष पोलीस महानिरीक्षक
झाले. मात्र सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला नसताना त्यांच्या बदलीचे आदेश आले. हे आदेश चुकीचे आहेत व बदलीच्या संदर्भात त्यांना कुठलीही कल्पना नव्हती. आपल्या चुकीच्या बदलीसंदर्भात त्यांनी कॅटमध्ये अर्ज केला. त्याची सुनावणी 11 जुलै रोजी झाली. त्यांचा अर्ज कॅटने दाखल करुन त्यावर 19 जुलैला सुनावणी होणार
आहे. तोपर्यंत त्यांनी पदभार देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यात उप पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, प्रभारी पोलीस अधीक्षक या पदावर त्यांनी काम केले आहे. नांदेड येथे ते प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून व अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली नांदेड येथे झाल्यानंतर
त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही झाला होता. मात्र शासनाने हि बदली चुकीच्या पध्दतीने केली व विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर केवळ सव्वा वर्षात महावरकर यांची बदली करण्यात आली. शासनाच्या या घोळाबाबत व महावरकर यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी कॅटमध्ये आपला अर्ज
दाखल केला. पुढील सुनावणी होईपर्यंत कुणालाही पदभार देवू नये, असे कॅटने सांगितले. त्यामुळे नांदेड परिक्षेत्राचा पदभार सध्या तरी महावरकर यांच्याकडेच आहे. गृहमंत्रालयाने चुकीच्या पध्दतीने केलेल्या बदलीचा फटका महावरकर यांना बसला असला तरी त्यांनी कॅटमध्ये याबद्दल दाद मागितली आहे.