महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान 2 हजार 125 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. 5 मे रोजी सायंकाळी 6 पासून जाहीर प्रचार बंद झाला आहे. या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे
पालन करण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. मतदारांवर कोणत्याही आमिष, प्रलोभन दिले जात असल्यास किंवा कोणताही दबाव आणला जात असेल किंवा धमकावले जात असल्याचे निदर्शनास असल्यास अशा व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय
अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची
प्रमुख उपस्थिती होती. लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लाख 77 हजार 42 इतके मतदार आहेत. 2 हजार 125 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून यासाठी नियुक्त मतदान पथकांमध्ये 8 हजार 500 अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी बीएलओ, चतुर्थश्रेणी कर्मचारी,
अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी असे 8 हजार 265 अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेली आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी बीएसएफ, एसआरपीएफ दलाच्या तुकड्या जिल्ह्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.