महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर जिल्ह्यात पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या एक ते सात दरम्यान अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. लातूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाकडून अंमलीपदार्थ
विरोधी 13 गुन्हे दाखल झाले असून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दोन ( मेडिकल दुकान ) औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. अशीच धडक मोहिम हाती घेऊन जिल्ह्यात कोणीही अंमलीपदार्थ विकण्यास धजावणार नाही, अशा कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत .
अंमलीपदार्थ विरोधी कारवाईचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे बोलत होत्या. यावेळी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त रु. वि. पोंगळे, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे
प्रतिनिधी स्थानिक गुन्हा शाखेचे ( LCB )पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत, महाविद्यायात, क्लासेसमध्ये अंमलीपदार्थाच्या दुष्परिणामाविषयी जागृती करावी. विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ
लोकांचे व्याख्यान ठेवावे, मोठे बॅनर्स लावावेत, अशा सूचना देऊन (MIDC) एमआयडीसी मध्ये कोणी अनधिकृत अंमलीपदार्थ साठा किंवा निर्मिती तर करत नाही ना, यासंदर्भात अत्यंत बारकाईने पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी, अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे पाहणी करावी, असे आदेशही जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले. मेडिकल स्टोअर्स मधून डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशन शिवाय काही प्रकारची औषध विकली जातायत का, याची पडताळणी अन्न व औषध प्रशासन विभागाने हाती घ्यावी. तसेच संबधित औषधाचा स्टॉक आणि डॉक्टर्सनी दिलेले प्रीस्क्रिपशन जुळतंय का याबाबतही कार्यवाही व्हावी, अशा सक्त सूचना
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या. किती खाजगी हॉस्टेल्स आहेत, त्या भागात कोणी संशयास्पद वस्तू विकते का याची माहिती घेऊन त्या भागात मुद्दाम होऊन लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगून कुरियर सर्व्हिस कंपन्यानीही सजग होण्याबाबत सूचना द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.