महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे झालेल्या प्रलयंकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना शनिवारी जिल्ह्यातील आणि राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून श्रध्दांजली वाहण्यात आली. या प्रलयंकारी भूकंपाच्या दिवशी ची एक आठवण लातूरचे मा. महापौर
विक्रांत गोजमगुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून श्रध्दांजली वाहिली. ती काळरात्र…. कधीही विसरता न येणारे छायाचित्र. आजच्याच दिवशी तब्बल 30 वर्षांपुर्वी आपला जिल्हा भूकंपाने हादरला, किल्लारी आणि परिसरातील अनेक गावांमधील हजारो नागरिकांना जीव गमावावा लागला. परंतु त्या नंतर राज्य सरकार, स्थानिक
लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, नागरिक यांनी सामूहिक जबाबदारीने जे कार्य केले ते अतुलनीय होते. यामध्ये सर्व आदरणीय नेत्यांच्या समवेत माझे वडील विक्रमजी गोजमगुंडे यांनीही आपली भूमिका बजावली होती. त्याच दरम्यान घेतलेला हा फोटो आज सोशल मीडिया वर ट्रेंडिंग होत आहे. माझ्यासाठी कधीही विसरता न येणारे हे
छायाचित्र आहे. भूकंपाच्या आठवणी आजही जाग्या आहेत, मला आठवतय की आधल्या दिवशी गणेश विसर्जन होते आणि त्याकाळी गणेश मंडळांच्या मिरवणुका रात्रभर चालत असत आणि बऱ्याचदा दुसऱ्या दिवशी दुपारी गणेश विसर्जन संपत असत. त्याकाळी मिरवणुका पाहायला रात्रभर नागरिक रस्त्यावर असायचे.
आमचे राहते घर त्यावेळी सुभाष चौक येथे होते आणि प्रत्येक मिरवणूक घरासमोरून जात असे, असाच त्या रात्री मिरवणुका पाहत पाहतच मी झोपी गेलो असेन आणि कदाचित पहाटे 4 वाजताच्या सुमारास अचानक कोणी तरी गदागदा हलवत आहे असे वाटून जाग आली आणि डोळे उघडून पाहिले तर लातूर शहरात असूनही आमचे घर
पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे हालत होते, काय होतंय कळत नव्हतं, घरातील सर्वजण घाबरून गेलो, स्वागत मंचावरून कोणी तरी शहरात बॉम्ब स्फोट झाला असा उल्लेख केल्याने रस्त्यावर धावाधाव सुरू झाली होती. साहजिकच आदरणीय तात्या लोकप्रतिनिधी आणि त्यांचा वावर अनेक गणेश मंडळात असल्याने ते बाहेरच होते, घरात आईसह
मी आणि माझे ज्येष्ठ बंधू विशाल भैया एवढेच, त्यामुळे भीती अधिक बळावली होती. काळजीने तात्यांनी काही लोकांना घराकडे पाठविले, त्यानंतर बराच वेळ गेला, तात्याही पोलीस आणि वरिष्ठ महसुली अधिकारी यांच्याशी संपर्क करून माहिती घेत होते आणि त्यांना हा बॉम्ब स्फोट नसून भूकंप असल्याचे कळले, पण नेमके ठिकाण
कळलेले नव्हते, तात्यांनी सुभाष चौक येथील सर्व स्वागत मंचावरून याबाबतची माहिती देण्यास सांगितले आणि माईक वरून सांगण्यात आले की जवळपास कोठे तरी भूकंप झालेला आहे. “भूकंप” हा शब्दही त्यावेळी आपल्या लातूरच्या मंडळींना नवाच होता. त्यामुळे काय करावे हे कोणालाही माहिती नव्हते. थोड्यावेळाने लोक रस्त्यावर
पुन्हा गर्दी करू लागले, कदाचित एक दोन धक्केही जाणवले. सर्वांनी मिळून गणेश विसर्जन तात्काळ आटपून घेतले आणि सकाळच्या सुमारास तात्याही घरी आले. आणि लागलीच बाहेर पडले, आम्ही लहान असल्याने नेमके काय होत आहे हे कळण्याच्या पलीकडे होते. दुसऱ्या दिवशीपासून मात्र कळायला लागले की किल्लारी
येथे भूकंप होवून हजारो नागरिक जमिनीखाली गाडले गेले आहेत आणि मदतकार्य सुरू आहे. त्यापुढील तीन चार दिवस तात्या त्यामध्येच सहभागी झालेले होते. आम्ही मात्र शहराच्या जवळच असणाऱ्या शेतीमध्ये राहायला गेलो होतो. शहरात जीवनावश्यक वस्तू, कपडे, अन्न किल्लारीला पाठवण्यास सुरुवात झालेली होती. अनेक
सामाजिक संस्था, गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी, अगदी विद्यालये हे साहित्य एकत्र करून पाठविण्यात पुढाकार घेत होते. वर्तमान पत्रातून याची माहिती कळायची, भीषण छायाचित्र पाहून सर्वांचं मन हळहळत असे. पण या काळात राज्य सरकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, नागरिक यांनी सामूहिक जबाबदारीने जे
कार्य केले ते अतुलनीय होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरदजी पवार, मंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी सर्व यंत्रणा अशा काही पद्धतीने मदत आणि पुनर्वसन कामाला लावल्या होत्या की ज्याचे पुढे चालून जगभरात आदर्श असे काम उभे राहिले. यादरम्यान आदरणीय तात्या सर्वांच्या समवेत झपाटून कार्यरत राहिले.
त्याचा दरम्यानचा हा फोटो होता. पुढे अनेक वर्ष लातूर म्हटलं की प्रत्येकाला भूकंप आठवायचा. मला चांगले आठवत की, माझे बंधू विशाल भैया हे दोन तीन जेवले देखील नव्हते ते आईला सांगायचे घरातील सर्व स्वंयपाक, त्याचे स्वतःचे कपडे किलारीला पाठवून द्या. अनेक लातूरकरांप्रमाणे परिवाराने योगदान दिले, ही मदत
अतिशय जुजबी असली तरी त्यामागील संवेदना मोठी होती. कदाचित अशा घटनांमुळेच आपल्यावर सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार घडत असतात. या घटनेला 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. अनेक परिचित तथा अपरिचित कुटुंबांनी आपले स्वजन त्या महाप्रलयात गमावले. त्या सर्वांना अभिवादन.