महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – अन्यायकारक निजाम राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी देण्यात आलेला लढा हा मराठवाड्याची अस्मिता आहे. या लढ्याचा इतिहास या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. हा लढा आणि या लढ्यातील लातूर जिल्ह्याचे योगदान भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात
आली आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मुक्तिसंग्रामातील वीरांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा पुढील पिढीला समजावी, यासाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून ज्ञानेश्वर माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालयात व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. इतिहास हा भविष्याचा वेध घेणारा असतो, आपण ज्या भूमीत राहतो, तेथील इतिहास आपण जाणून घ्यायला हवा. आपल्या भूमीला अन्यायकारक राजवटीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेक शूरांनी हौतात्म्य पत्करले. त्यांचा इतिहास आपल्याला देश, समाजाप्रती समर्पण, त्याग शिकविणारा असून या इतिहासापासून प्रेरणा घ्यावी. सर्वांनी आपल्या
मनात माणुसकीची ज्योत तेवत ठेवून देशासाठी, समाजाच्या कल्याणासाठी कर्तव्य भावनेने काम करून विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. या वेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डी. एन. शेळके, मुख्याधापक एस. एम. वाघमारे उपस्थित होते.