Ajit pawar उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस राज्यात ‘अजित उत्सव’ म्हणून साजरा करणार – सुनील तटकरे

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 22 ते 31 जुलै हा सप्ताह ‘अजित उत्सव’ या नावाने संबंध महाराष्ट्रात साजरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील

तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील शेतकरी पेरण्या न झाल्याने संकटात आहे याची जाणीव असल्याचे अगोदरच स्पष्ट करताना सुनील तटकरे यांनी या वाढदिवसाचे प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार असल्याचे सांगितले. अजितदादांची राजकारणाची सुरुवात समाजकारणापासून

सहकार क्षेत्र, शिक्षण, कला, क्रीडापासून झाली. ज्या – ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये काही काळ लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, राज्य सहकारी बँकेचे प्रमुख, विधानसभा सदस्य, मंत्री, विविध खात्याचा पदभार, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत असताना अजित पवार यांनी

विकासाला महत्त्व दिले आहे. सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवली. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायी भाव आहे. काहींना तो आवडत नसेल मात्र महाराष्ट्रातील जनतेला चांगल्यापध्दतीने तो रुचला आहे. अजितदादांच्या नेतृत्वाची एक वेगळी झलक महाराष्ट्राने दीर्घकाळ अनुभवली आहे. महाराष्ट्रातील तरुणाई सुध्दा त्यांच्या

नेतृत्वाकडे आकर्षित झालेली पहायला मिळत आहे असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमात सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा विचार आम्ही केला आहे. मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, वॉटरफिल्टर, छत्री वाटप,शाळकरी मुलींना

सायकली मोफत देण्याचा कार्यक्रम, वृक्षलागवड, ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानी भेटी, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, अजितदादा जसे सकाळी सहा वाजता उठतात तसंच ग्रामस्वच्छता अभियानासाठी दोन तास देणे असा सामाजिक उपक्रम राज्यभर सप्ताहाच्या कालावधीत राबवला जाणार आहे असेही सुनील तटकरे यांनी

सांगितले. महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण, त्यामध्ये लघु, मध्यम उद्योग, खादी ग्रामोद्योग भारत सरकार व राज्यसरकार यांच्या माध्यमातून 35 टक्के अनुदानातून वेगवेगळे व्यवसाय करण्याची संधी, महिला कोणता व्यवसाय घेऊ शकतात याचे मार्गदर्शन आणि व्यवसाय निवडल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकातून त्यांना कर्ज कसे

उपलब्ध होईल, त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल असा व्यापक कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे. याशिवाय महिला आरोग्य विषयक शिबीरेही घेतली जातील. या शिबिरात गंभीर आजाराचे निदान झाल्यावर त्या रुग्णाला उपचार कसे मिळतील याचे नियोजनही करण्यात आले आहे असेही सुनील तटकरे

यांनी स्पष्ट केले. बेरोजगारी आणि युवक हा प्रश्न संबंध राज्यात आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ‘रोजगार नोकरी महोत्सव’ मेळावा राज्यात आयोजित करणार आहोत. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील राहणार आहोत.

याशिवाय राज्यसरकार जी रिक्त पदांची भरती करणार आहे त्याची माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न या उपक्रमात अंतर्भूत केला आहे असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. इनडोअर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याशिवाय युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यातील युवतींसाठी शाळा व महाविद्यालयात

‘स्वसंरक्षण शिबीरे’ आयोजित केली जाणार आहेत असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. अजितदादा पवार या नेतृत्वाचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रात व देशभरात त्यांची ओळख विलक्षण पद्धतीच्या कामाचा झपाटा, अचूक वेळ आणि मेहनत करण्याची असलेली क्षमता या त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित सर्वच सामाजिक उपक्रम या

सप्ताहात साजरे केले जाणार आहेत असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, ठाणे शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे