महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – मराठा समाजातील युवकांना उद्योग, व्यवसायासाठी सहाय्य करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसोबतच शासनाच्या इतरही योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांची
सकारात्मक भूमिका आवश्यक असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत नरेंद्र पाटील बोलत होते. लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., कौशल्य विकास,
रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे, अरविंद पाटील-निलंगेकर, महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास युवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु
करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 445 लाभार्थ्यांना 11 कोटी 90 लक्ष रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. आणखी 2 हजार 505 लाभार्थ्यांना उद्देशीय पत्र (एलओआय)
प्राप्त झाला असून त्यांना बँकांकडून कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जावा, असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले.
बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात आल्यानंतर 12 टक्के दराने लाभार्थ्यांच्या व्याजाची रक्कम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत अदा करण्यात येते. त्यामुळे
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लाभार्थ्यांच्या उद्योग, व्यवसायाला हातभार लागतो. समाजातील जास्तीत जास्त युवक-युवतींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सर्व पात्र लाभार्थ्यांचे कर्ज मंजूर करावे, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँकांनी यामध्ये पुढाकार घेण्याचे
आवाहनही त्यांनी केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या योजनांबाबत बँक अधिकारी, कर्मचारी यांनाही अचूक माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेवून त्यांना या
योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये जिल्ह्यातील बँकांना देण्यात आलेले उद्दिष्ट आणि त्या अनुषंगाने बँकांनी केलेल्या कार्यवाहीचा नरेंद्र पाटील यांनी यावेळी बँकनिहाय आढावा घेतला.