महाराष्ट्र खाकी ( लातूर /प्रतिनिधी ) – दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त येथील सिग्नल कॅम्प परिसरातील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरात एकूण 164 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या मोफत अस्थिरोग शिबिराचे उद्घाटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते प्रा. बी.व्ही. मोतीपवळे , युवा नेते अभिजित देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटल परिवाराच्या वतीने साहिल अशोक पोद्दार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. पोद्दार हॉस्पिटल परिवाराच्या
वतीने मागच्या सलग 10 वर्षांपासून लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले जाते. आरोग्यसेवेसोबतच सामाजिक कार्यातही सातत्याने अग्रेसर असणाऱ्या ज्येष्ठ अस्थि शल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांना ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे, त्या समाजप्रतीही आपण काही देणे लागतो, या
भावनेने झपाटून टाकले आहे. म्हणूनच ते सातत्याने अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याकामी आघाडीवर असतात. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. बी.व्ही. मोतीपवळे यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन म्हटले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम डॉ. अशोक पोद्दार यांचा चेहरा येतो, असे मत व्यक्त केले. मोफत आरोग्य शिबिराच्या आयोजनाचे
जन्मदाते, असा डॉ. अशोक पोद्दार यांचा उल्लेख केल्यास कोणालाही नवल वाटू नये, असे सांगून या शिबिराच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचे त्यांनी कौतुक केले. युवा नेते अभिजित देशमुख यांनी यावेळी बोलताना डॉ. अशोक पोद्दार यांच्या आरोग्यसेवेचे तसेच त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्दही नाहीत, असे गौरवोदगार काढले.
समाजातील सर्वच स्तरातील रुग्णांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ते सातत्याने अशा प्रकारच्या मोफत शिबिरांचे आयोजन करण्याकामी पुढाकार घेत असतात. समाजातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये, या भावनेने ते आरोग्यसेवा करण्याचे काम करत असतात,असेही त्यांनी बोलून दाखवले. या शिबिरात 38 रुग्णांची मोफत
फिजिओथेरपी करण्यात आली. 18 रुग्णांचे एक्सरे आणि 16 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. तर 88 रुग्णांची मशिनद्वारे हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली. तसेच हाडांच्या विविध व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णांचीही तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिरास डॉ.चेतन सारडा यांसह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी साहिल अशोक पोद्दार, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. प्रशांत अभोरे , डॉ. पल्लवी जाधव, वसीम शेख यांसह पोद्दार हॉस्पिटलच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.