महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहर व परिसरात गुटखाबंदीचे अक्षरश: तीनतेरा झाले असून, गुटखा विक्री एकदम ‘ओकेमधी’ आहे. संबंधित यंत्रणेकडून कठोर चौकशी व कारवाई होत नसल्याने गुटख्याची राजरोसपणे विक्री होत असल्याचे चित्र आहे.शासनच्या आदेशाने गुटखाबंदी करण्यात आली असली तरी अत्यंत नियोजनबद्धरीत्या गुटख्याची आयात
करून विक्रीचे जाळे पद्धतशीरपणे चालवले जात आहे. संबंधित यंत्रणेशी अर्थपूर्ण व्यवहार करून लाखोंची उलाढाल गुटखा विक्रीतून होत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत गुटखा सेवन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. गुटखाबंदी असली तरी प्रत्येक ठिकाणी गुटखा सहजपणे मिळत आहे. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय यांच्या परिसरात
सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे. राज्यात गुटखा बंदी असली तरी शेजारच्या राज्यात बंदी नसल्याने तेथून गुटख्याची आयात करून एजंट व व्यापार्यांच्या माध्यमातून विक्रीचे जाळे तयार करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणेला हे सर्व माहीत असले तरी आर्थिक देवाणघेवाणीतून या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. लातूर येथे कायमस्वरूपी अन्न व औषध प्रशासनाचे
अधिकारी कमी असल्याने जिल्ह्यात कारवाई करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. लातूर शहरातील शासकीय कार्यालये,व्यापारी संकुले, शहरातील प्रमुख रस्ते व चौकांचे कोपरे गुटखा खाणाऱ्यांच्या थुंकीमुळे रंगलेले आहेत. पोलिसांना गुटखा विक्री संदर्भात कारवाई करायची असली तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलवून कारवाई करावी लागते व कारवाईनंतर देखील संबंधितांवर
कठोर शासन होताना दिसत नाही. त्यामुळे कारवाईचा केवळ देखावा केला जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे तोंडाच्या आजाराचे प्रमाण वाढून तरुणाईचे बळ नष्ट होत आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गुटखा विक्रीवर कठोर निर्बंध प्रस्थापित करावेत, अशी मागणी व अपेक्षा व्यक्त होत आहे.