महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके) – निलंगा तालुक्यात औराद शहाजानी, हालसी, तुगाव, तगरखेडा, हलगरा, सावरी या गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. काही भागांत गाराही पडल्या. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती. औराद
शहाजानी व परिसरात मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. यात हलक्या गाराही पडल्या. पावसापेक्षा वादळी वारे जास्त होते. या वाऱ्यात अनेक झाडे उन्मळून पडली. औराद, तगरखेडा, हालसी या रस्त्यांवर झाडे उन्मळून, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या असल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. तगरखेडा, हालसी या
गावांना विद्युत पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळले अनेक ठिकाणी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, या पावसामुळे भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतशिवारातील उन्हाळी सोयाबीनच्या बनिमी उडून गेल्या असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी तगरखेडा उपसरपंच मदन बिरादार यांनी केली आहे. दरम्यान,औराद शहाजानी हवामान केंद्रावर 10 मि.मी. पाऊस पडल्याची माहिती हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी दिली.