महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके ) – आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. प्रचार साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. यासाठी साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि खासदार शरद
पवार यांनी 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रंसगी केले. उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी संमेलन अध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो, संमेलनाचे
कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती श्रीमती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे (राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी,
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, श्रीमती उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मनोहरराव म्हैसाळकर आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
“साहित्यिकांनी कोणत्याही विचारधारेला बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची
आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते. समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे. राज्यकर्ते मतप्रचार थेट करीत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन मतप्रचार राबवणे सुरू केले आहे, असे पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, “ साहित्यविश्वात देखील
राजकारणाचा शिरकाव झाला आहे. विशेषत: संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड निवडणूक पद्धतीने सुरू झाल्यानंतर साहित्यिकांच्या अंतरंगात आमच्यातील राजकारणी घुसू लागला आहे. त्याचा अत्याधिक तोटा महिला साहित्यिकांना संभवतो. महामंडळाने निवडणूक पद्धतीत एखादे महिला समावेशक धोरण आणले तर त्याचे मी प्रथम स्वागत करेन. महामंडळाच्या घटनेत सुधारणा
करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हाव्या अशी तरतूद असावी. या महिला धोरणाचा पुरस्कारकर्ता म्हणून मी येथे उभा राहिलो याची चर्चा साहित्य संमेलनात झाली तर त्याचा मला आनंदच आहे.” “साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा आज जाणवते. संशोधनात्मक लिहिले जात असेल परंतु ते वाचकांपर्यंत पोहोचत नसावे.
विशेषत: ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन व अभ्यास आवश्यक असतो. इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्कीक माहिती आधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वाद-विवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे. नाहीतर जनमानसांत त्या चुका मूळ धरू लागतात आणि ठाण मांडून बसतात. अशा वृत्तींना ‘बाप दाखव
नाहीतर श्राद्ध कर’! असा रोखठोक सवाल विचारावयास हवा. कयास आणि कल्पनाविलास करण्यासाठी इतर फिक्शनल साहित्य प्रकार आहेत. विद्यापीठांनी मराठीत पीएचडीसाठी विषय देताना तो संशोधनक्षम द्यावा, केवळ संकलनक्षम देऊ नये. सखोल संशोधनानंतर झालेले साहित्य माहितीचे नवे भांडार ठरू शकते, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. काव्य साहित्याची वानवा …
कवितांची पुस्तके आज कमी होत चालली आहेत, अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अर्थकारणाचे गणित जुळत नसल्याने हे घडत असावे, असे मला वाटते. मात्र एकूणच ग्रंथ प्रकाशनाची बाजू फारशी उत्साहवर्धक नाही. नव तंत्रज्ञान आणि बदललेल्या सवयी, परभाषेचे आक्रमण, मनोरंजनाच्या साधनाची रेलचेल, मराठी शिक्षणाकडे कमी
होत चालेला ओढा यामुळे ग्रंथ प्रकाशन संस्थांची आर्थिक परिस्थितीही खालावत चालली आहे, हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे शरद शरद पवार यांनी सांगितले.