महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके ) – राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, “मराठी आपली मायबोली आहे. मराठी सेनांनी देशभरात आपली राज्ये स्थापन केली आणि मराठी देशभरात पोहचविली आहे. त्याचे आपण जतन केले पाहिजे. त्यासाठी आपण देशातील विविध राज्यात साहित्य संमेलने आयोजित केली पाहिजे अशी माझी मागणी आणि विनंती आहे. आपले
सरकार मराठी भाषा संवर्धनासाठी काम करीत आहे. मराठी भाषा भवन हे मुंबईत उभे राहत आहे. यामध्ये मराठी भाषा प्रवासाचे टप्पे उलगडून दाखविणारी दालने असणार आहेत. सरकार सर्व जिल्ह्यात मराठी भाषा केंद्र सुरू करणार आहे. राज्य सरकार भिल्लारसारखे ‘पुस्तकाचे गाव’ प्रत्येक महसूल विभागात स्थापन करणार आहे. राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तीन
कायदे केले आहेत. त्यात राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली आहे. लहान-मोठ्या दुकानांवर मराठी भाषेत पाट्या असाव्यात असा कायदा केला आहे. त्यातील पळवाटा दूरू करण्यात आल्या. महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये मराठीत संवाद करण्याचा कायदा करण्यात आला आहे. राज्य सरकारने मानसन्मान देण्याची जबाबदारी पार पाडत आहे. मात्र
त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही नागरिकाची सुद्धा आहे. मराठी भाषा ही स्वतंत्र भाषा आहे. लोकसभा-राज्यसभेमध्ये मराठीला अभिजात भाषा देण्याचे आश्वासन देण्यात आले. पण अजून तो दर्जा मराठीला देण्यात आलेला नाही. तो मिळावा यासाठी मराठी माणसाने ताकद लावली आहे. त्यात जनमत निर्माण करण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना
पोस्टकार्ड पाठविण्यात आली. त्याचा दुसरा टप्पा आता आम्ही सुरु करणार आहोत. आम्ही शांत बसणार नाही. तो आमचा श्वास आहे. केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावाच लागेल. तो पर्यत आम्ही स्वस्थ बसणार नाही. राजभाषा कोश हा शिवाजी महाराज यांनी तयार केला. आता राज्य सरकारतर्फे सुलभ असा राजभाषा कोश तयार करण्यात येत आहे.