महाराष्ट्र खाकी ( पिंपरी ) – नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत म्हापसा विधानसभेची जागा आपणच जिंकून आणल्याचा, तसेच गोव्यात भाजपची सत्ता येण्यामध्ये आपला खारीचा वाटा असल्याचे सांगत विजयाचे श्रेय घेणारे भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे हे कोल्हापुरातील भाजप उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्विकारणार का ?
असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी उपस्थित केला आहे. कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा निवडणुकीत सुमारे 19 हजारांच्या मताधिक्क्याने काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला, तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. या मध्यावधी निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून, त्यात म्हटले आहे की, गोव्यात भाजपच्या उमदेवाराचा प्रचार करणारे महेश लांडगे हे सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात तळ ठोकूण बसले होते. तसेच भाजपचाच विजय होणार, असे दावे करत होते. मात्र, धर्मांध मुद्यांच्या आधाराव प्रचार करणार्या भाजपला शाहू महाराजांची विचारसरणी
आजही जपणार्या कोल्हापुरकरांनी त्यांची खरी जागा दाखविली आहे. गोव्यात भाजपच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर लांडगे यांनी गोव्यात भाजपची सत्ता येण्यात आपण वाटा उचलल्याचा दावा करतानाच त्याचे श्रेय लाटले होते. पत्रके काढून प्रसिद्धीही मिळविली होती. आता कोल्हापुरात लांडगे यांनी प्रचार केल्यानंतरही पराभव झाल्याने त्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारी दाखविण्याचे धाडस त्यांनी दाखवावे, असे
आव्हानच रविकांत वरपे यांनी दिले आहे.
कोल्हापुरची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये होणार
भाजपच्या नेत्यांनी इतरांना पुढे करून कितीही भोंगे वाजविले आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी जनता सुजाण आहे हेच कोल्हापूरच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भोंगे बहाद्दरांकडून असाच प्रकार घडवून जाती-धर्मांमध्ये तेढ
निर्माण करण्याचा तसेच त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडची जनता भाजपचे डाव ओळखून असल्याने धर्मांध मुद्यांना स्थान न देता विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीला साथ देईल व भाजपचा करेक्ट कार्यक्रम करेल. कोल्हापुरच्या विजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये होईल, असा विश्वासही रविकांत वरपे यांनी व्यक्त केला आहे.