महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – राज्यातील तीन पक्षाचे सरकार हे महाविकास आघाडीचे नसून महाबिघाडीचे आहे. हे सरकार भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचविण्यासाठी धडपड करत आहे. समाजातील कोणताच वर्गाला हे सरकार न्याय देऊ शकले नाही, याला आता जनताच पूर्णपणे कंटाळली असून बदलाची वाट पहात आहे असा घणाघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी बुधवारी येथे प्रचार सभेत बोलतांना केला. महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर त्याची सुरवात कोल्हापुरातील विजयाने करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीतील भाजपा, रिपाइं, जनसुराज्य, ताराराणी आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, माजी खा. धनंजय महाडिक, समरजितराजे घाडगे, आ. सिद्धार्थ शिरोळे, युवा मोर्चाचे विक्रांत पाटील, महेश जाधव ,उमेदवार सत्यजित कदम, उमाताई खापरे, योगेश टिळेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, तीन पक्षाच्या बिघाडी सरकारमध्ये आज कोणतीच जनता खुश नाही. विकास कामे रखडली आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. खून, दरोडे, हत्या, माफियाराज वाढला आहे. आम्ही दिलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण यांनी घालवले. केवळ भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचविण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. या सर्व कारभाराला जनताच कंटाळली असून कधी बदल होईल याची वाट पहात आहे. अशा सरकारला संपविण्याची वेळ आलेली आहे असे पंकजाताई म्हणाल्या.
देशाचे प्रचंड नुकसान करून स्वतःच्याच घरात सत्ता आणणाऱ्या काॅग्रेसला संपूर्णपणे नेस्तनाबूत करायचे आहे, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅग्रेसमुक्त भारत असा नारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निकालावरून ते सिध्द झाले आहे. काॅग्रेसने गरीब शब्दाचा फक्त वापर केला. गरीबी हटावचा नारा दिला पण गरीबी हटवली नाही मात्र गरीबांना हटविण्याचे काम केले अशी टिका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गरीबी अनुभवली आहे, त्यामुळेच त्यांनी गरीब शब्दाच्या भोवती सर्व योजना विणल्या. जन धन, उज्ज्वला गॅस, बेटी बचाओ आदी योजना राबवून त्यांनी महिलांचा सन्मान वाढवला. गरीबांचा खरा कळवळा त्यांच्यामध्ये आहे असे पंकजाताई म्हणाल्या.
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या नावातच जित म्हणजे विजय आहे आणि तो सत्याचा आहे त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे, असे पंकजाताई म्हणाल्या. कोल्हापूरचा खरा विकास साधायचा असेल तर कदम यांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. कोल्हापूर आणि सांगली चे प्रभारी पदाची जबाबदारी आपल्यावर आहे,इथे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मेहनत घेऊ असे सांगून ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असेही मिश्किलपणे त्या म्हणाल्या. सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सभेपूर्वी कोल्हापूरात पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्त्यांनी ठिक ठिकाणी जोरदार स्वागत केले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांनी अभिवादन केले तसेच श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.