महाराष्ट्र

“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल…


महाराष्ट्र खाकी (आंबेगाव) – या उक्तीला साजेसे व्यक्तिमत्व व माझ्यासारख्या अनेक युवकांचे आदर्श असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व अभ्यासू नेते, महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा,अर्थ,उच्च व तंत्रशिक्षण, कामगार कल्याण व उत्पादन शुल्क यांसारख्या महत्वाच्या विविध खात्यांची मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेले, महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणून सभागृहाच्या इतिहासात स्वतःची एक वेगळी छाप सोडणारे व राज्याचे विद्यमान कर्तव्यदक्ष गृहमंत्री मा.ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्याबद्दल वरील उक्ती अत्यंत चपखलपणे बसते आहे. 30 ऑक्टोबर या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साहेबांना आंबेगाव तालुक्यातील तमाम युवक बंधू भगिनींच्या वतीने वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या व सुदृढ आरोग्याच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. गेली अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम करीत असताना त्यांची सामान्य माणसा प्रति असणारी संवेदनशीलता, प्रशासनावर असणारी मजबूत पकड, विकासाची दूरदृष्टी, संकटकाळी प्रशासकीय व्यवस्था हलविण्याची प्रभावी पद्धत व सर्वसामान्य लोकांची सामाजिक व वैयक्तीक स्वरूपातील अडीअडचणी दूर करण्याचा स्थायीभाव या त्यांच्या गुणांमुळे प्रभावित होऊन आजवर माझ्यासारखे हजारो युवक त्यांच्यासोबत मनाने जोडले गेले आहेत.


          राज्याच्या सलग सात विधानसभा निवडणुकांमध्ये आंबेगाव तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने मा.ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांना दरवेळी चढत्या मताधिक्क्याने निवडून देऊन त्यांच्यावरचा विश्वास सार्थ ठरविला आहे तो याचमुळे!
         आंबेगाव तालुक्यात सहकार महर्षी म्हणून प्रसिद्ध असणारे माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील उर्फ दादा यांचे सुपुत्र दिलीपराव वळसे पाटील यांनी राजकारणाचे धडे आपल्या कुटुंबातूनच गिरवण्यास सुरुवात केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री मा.शरदचंद्र जी पवार साहेब यांच्याशी दत्तात्रेय वळसे पाटील यांचा चांगला व्यक्तिगत स्नेह असल्याने राजकारणाचे पुढील धडे गिरवण्यासाठी त्यांनी दिलीपरावांना, पवार साहेबांकडे स्वीय सहाय्यक म्हणून रुजू केले.सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सातत्याने विकासाच्या दृष्टीने वाटचाल कशी करायची याची शिकवण घेऊन दिलीपराव वळसे पाटील सन 1990 साली तालुक्यात परतले व आंबेगाव तालुक्यातील स्वतः ची पहिली विधानसभेची निवडणूक लढले व जिंकले देखील. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी विरोधी विचारांच्या मानल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यात विविध दिग्गजांचा चढत्या मताधिक्क्याने पराभव करत,जनतेच्या मनातील आपला करिष्मा टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे.
           विधानसभेत पाऊल ठेवल्यानंतर काम करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत व विकासाची दूरदृष्टी या गोष्टींमुळे मा. शरदचन्द्र जी  पवार साहेब यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जावू लागले व 1999 साली आंबेगाव तालुक्याला दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या रूपाने पहिली मंत्रिपदाची माळ गळ्यात पडली व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे आनंदाला पारावर राहिला नाही.त्यानंतर जेव्हा केव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत राहिला तेव्हा तेव्हा साहेबांवर राज्याच्या दृष्टीने मोठी व महत्त्वाची जबाबदारी पक्षाकडून सातत्याने देण्यात आली. राज्यात विविध विभागांची वजनदार मंत्रिपदे सांभाळत असताना त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याचा अनुभव व दूरदृष्टीचा पुरेपूर वापर करत सर्वसामान्य जनतेसाठी ऊर्जा,अर्थ व उच्च व तंत्र शिक्षण खात्यामध्ये महत्त्वाचे व भरीव स्वरूपाचे निर्णय घेतले. इतकी सर्व शक्तिशाली पदे मिळालेली असूनही वळसे पाटील साहेबांची आज वरची 32 वर्षांची राजकीय कारकीर्द कुठलाही डाग नसलेली आहे, स्वच्छ आहे हे त्यांचे समर्थक नाही तर विरोधक सुद्धा मान्य करतात. हाच त्यांच्या नैतिक राजकारणाचा खराखुरा विजय आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी आपले सर्व प्रशासकीय कौशल्य अनुभव पणाला लावीत वळसे पाटलांनी सभागृहातच नाहीतर राज्यातील जनतेवर स्वतःची विशेष अशी छाप सोडली. आजही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचेच नाव घेतले जाते.


          राज्यातील जनतेसाठी मोठे व महत्त्वाचे निर्णय घेत असताना दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी आपला मतदारसंघ असणाऱ्या आंबेगाव तालुक्याचे तर रूपच पालटून टाकले. 1990 पूर्वी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या व जिरायती शेती हाच एकमेव उत्पन्नाचा आधार असणाऱ्या आंबेगाव तालुक्याची धुरा साहेबांनी हातात घेतल्यापासून आज पर्यंत तालुक्यातील जनतेने खऱ्या अर्थाने विकास व प्रगती काय असते हे अनुभवले आहे.आंबेगाव तालुका डोंगरी व आदिवासीबहुल लोकसंख्येचा तालुका म्हणून गणला जातो. पायाभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या आदिवासी समाजाला विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून साहेबांनी स्वतःच्या पायावर उभे करून स्वाभिमानाने जगण्यास शिकवले. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील भीमाशंकर विकास आराखडा,भक्त निवास तळेघरची आश्रम शाळा, पाटण खोऱ्यातील मोठा पूल, रस्ते, विविध अनुदान, शासकीय योजना, आरोग्य व शिक्षणाच्या सोयी यामुळे आदिवासी समाजाची प्रगती झाल्याने आजही मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज हा साहेबांचा पाठीमागे प्रत्येक निवडणुकीत खंबीरपणे उभा राहिला आहे. हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरणातून निघालेले डावा व उजव्या कालव्यांच्या माध्यमातून व मतदार संघात बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतीचा बहुतांश भाग हा ओलिताखाली आला असून शेतकरी बारमाही नगदी पिके काढू लागला. राज्यातील पहिल्या क्रमांकाचे अनेक पुरस्कार मिळालेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून, ऊसाच्या शेतीस प्राधान्य देऊन व सर्वाधिक बाजारभाव देऊन तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. शरद सहकारी बँक तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इत्यादी आर्थिक संस्थांच्या माध्यमातून, तालुक्यातील शेतकरी व उद्योजकांना शेती व उद्योगासाठी भांडवल उभारणी करण्यात मदत केली गेली.अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाने तर अवसरी व मंचर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.तसेच मंचर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून तालुक्यातीलच नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्यातील शेकडो रुग्ण दररोज मोफत व दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घेतात.त्याचप्रमाणे मंचर येथील आंबेगाव तालुका क्रीडा संकुलाच्या माध्यमातून शेकडो आरोग्य प्रेमी मंडळी व खेळाडू मोकळ्या हवेत स्विमिंग पूल, व्यायाम शाळा ,क्रिकेटचे मैदान यांसारख्या सुविधांचा लाभ घेतात. तसेच महाविद्यालयीन युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सांस्कृतिक युवक महोत्सव भीमाशंकर करंडक देखील वळसे-पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच दरवर्षी आयोजित केला जातो.
          अशा रीतीने तालुक्यात शिक्षण, आरोग्य, प्रशासन यासोबतच कला, क्रीडा या विभागांमध्ये ही वळसे-पाटील साहेबांचे काम अत्यंत प्रभावी व उल्लेखनीय आहे.


इतकेच नाही तर माळीन सारख्या दुःखद प्रसंगात वळसे पाटील साहेबांची संवेदनशीलता व दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसना संबंधीची आग्रही भूमिका संपूर्ण तालुक्याने पाहिली. त्याचप्रमाणे सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात वळसे पाटील साहेबांनी उच्च प्रतीच्या व मोठ्या स्वरूपातील आरोग्य सुविधा उभ्या करून तालुक्यातील नागरिकांना तालुक्यातच सर्व प्रकारचे उपचार मिळवून देण्यासाठी मोठी जम्बो कोबड सेंटर व कोविड केअर सेंटर्स उभारली. अगदी सुरूवातीच्या काळात वळसे पाटील साहेबांनी शासकीय व खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना, डॉक्टरांना विश्वासात घेऊन उपजिल्हा रुग्णालय मंचर याठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केला. उत्तर पुणे जिल्ह्यात कोरोनाचे स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु करणारे मंचर उपजिल्हा रुग्णालय पहिले होते.जेणेकरून संशयित रुग्णांना स्वॅब देण्यासाठी पुण्याला जाण्याची गरज नव्हती. आंबेगाव तालुक्यात कोविड रुग्णसंख्या वाढण्यापूर्वीच वळसे पाटील साहेबांनी तालुक्यातील पहिले भीमाशंकर कोविड केअर सेंटर सुरु केले व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये तब्बल एक हजार रुग्णांसाठी कोविड विलगीकरण कक्ष सुरू केला. तसेच जेव्हा तालुक्यात रुग्णसंख्या जास्त वाढली होती. तेव्हा त्वरित निर्णय घेऊन शासकीय उपजिल्हा रुग्णालय मंचरचे रूपांतर शंभर खाटांच्या कोविड केअर सेंटर मध्ये केले. जसजसे संकट वाढत होते तसतशी वळसे पाटील साहेब शासकीय आरोग्य अधिकारी, खाजगी डॉक्टर्स, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी कार्यकर्ते अशा सर्वांना सोबत घेऊन आरोग्य सुविधा वाढवत होते.या सर्व शासकिय आरोग्य सुविधांचा लाभ घेऊन हजारो रुग्ण मोफत बरे होऊन आपल्या घरी गेलेले आहेत. त्यानंतर अवसरी येथे सुरू केलेल्या जम्बो कोविड सेंटर मध्ये आज आंबेगाव तालुका किंवा पुणे जिल्ह्यात नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातून व जिल्ह्यातून हजारो रुग्ण योग्य उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. इतकेच नाही तर मा.ना. दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांचे सहकारी देवेंद्रभाई शहा यांनी लॉक डाऊनच्या काळात  सलग तीन महिने दररोज हजारो कुटुंबांना भोजनाची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे कोविड केअर सेंटर व व जम्बो कोविड सेंटरमध्ये देखील रुग्णांच्या पौष्टिक व दर्जेदार आहाराची चौक सुविधा आजही सुरू आहे. तसेच covid रुग्णांच्याही नाश्त्याची व जेवणाची योग्य सोय करण्यात आली होती.


कोरोना संकटाच्या काळात वळसे पाटील साहेबांनी जितके प्रयत्न शासकीय पातळीवर केले त्याहीपेक्षा  अधिक प्रयत्न त्यांनी वैयक्तिक पातळीवर केले. परदेशात व परराज्यात अडकलेल्या अनेक विद्यार्थी व नागरिकांची सुरक्षितपणे घरी परत आणण्यापर्यंतची सर्व व्यवस्था असो किंवा अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांना ससून सारख्या शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे असो औषधे व इंजेक्शन उपलब्ध करून देणे असो की कुठलीही आर्थिक अडचण असो वळसे पाटील साहेबांनी स्वतः प्रत्येक प्रकरणात जातीने लक्ष घालून शेकडो रुग्णांना विविध आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री-अपरात्री स्वतः नागरिकांचे फोन कॉल्स स्वीकारून त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत त्यांना मदत केली व शासकीय अधिकाऱ्यांना सतत सूचना करून ही कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
गेल्या दीड पावणे दोन वर्षांचा कालावधी आपण सर्वांनीच अत्यंत खडतरपणे पार पाडला आहे. परंतु आंबेगाव तालुक्यात सामान्य जनतेसाठी ज्या प्रकारच्या मोफत आरोग्य सुविधा उभ्या केल्या गेल्या व वैयक्तिक स्वरूपात हजारो लोकांना मदत केली गेली ती पाहता आंबेगाव तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सोशल मीडियाच्याद्वारे अनेकवेळा वळसे पाटील साहेबांचे व त्यांच्या सहकार्याचे आभार मानलेले आहेत. परंतु ते तालुक्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत का आहेत हे नेहमी संकटकाळी त्यांच्या कौशल्यपूर्ण प्रशासकीय हाताळणीने व सदैव मदत करण्यात तत्पर असण्याच्या वृत्तीने लक्षात येते.
आज वळसे पाटील साहेबांचा वाढदिवस असून आंबेगाव तालुक्यातील तमाम युवक वर्गाच्या तसेच जनतेच्या वतीने वळसे पाटील साहेबांना वाढदिवसाच्या व सुदृढ आरोग्याच्या मी कोटी-कोटी शुभेच्छा देतो.

ॲड. राहुल प्रतापराव पडवळ
मंचर (पुणे)
9921881000

Most Popular

To Top