महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत सात नव्या रुग्णवाहिका दाखल-सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

महाराष्ट्र खाकी (कोल्हापूर ) – जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे रुग्णांच्या सोयीसाठी सात नव्या रुग्णवाहिका शासनाच्या आरोग्य विभागाकडून दिल्या असून याचा फायदा जिल्हा उप रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली असून उपचाराच्या सर्व सुविधांसह आवश्यक ते मनुष्यबळ सर्व शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिकेसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व उपकरणांसह सज्ज अशा रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला सात रुग्णवाहिका दिल्या गेल्या असून ग्रामीण रुग्णालय हातकणंगले, ग्रामीण रुग्णालय पारगांव, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, ग्रामीण रुग्णालय मलकापूर, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय नेसरी व ग्रामीण रुग्णालय गारगोटी अशा सात शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिका जिल्हा परिवहन विभागाकडे नोंदणी केल्यानंतर तातडीने सुपूर्त केल्या जातील, असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले,
गंभीर अथवा अतिगंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रांकडे चांगल्या दर्जाच्या रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे असते. या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना तातडीने उपचार होण्यास मदत होईल, असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शेवटी म्हणाले.

Most Popular

To Top