महाराष्ट्र

Kolhapur news,तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून डेथ ऑडीट करा – जिल्हाधिकारी दौलत देसाई

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अथवा संपर्क अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. या समितीच्या माध्यमातून रूग्णांचे मृत्यू का होत आहेत त्यामागील कारणं शोधण्यासाठी डेथ ऑडीट करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात दूरदृश्यप्रणालीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक आज झाली. जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले,अद्यापही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यायला हवा. त्यांचे स्वॅब घ्यायला हवे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात, एखाद्या शाळेत स्वॅब केंद्र सुरू करा. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आदेश काढावेत. झालेल्या चाचण्यांची डाटा एन्ट्री पोर्टलला केली पाहीजे.


रूग्णांच्या मृत्यू होण्याची बेसीक जबाबदारी त्या रूग्णालय प्रमुखाची आहे. त्यासाठी डेथ ऑडीट झाले पाहीजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, रूग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी जिल्हास्तरावर प्राचार्य प्रशांत पटलवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीशी संपर्क साधून आपल्या तालुक्यातील रूग्णालयांचे ऑडीट करून घ्यावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, उपमुख्य कार्यकारी अधिकरी मनीषा देसाई, डॉ. ऊषादेवी कुंभार आदी उपस्थित होते.

Most Popular

To Top