महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – कोरोना बाधित रुग्णांना बेड उपलब्ध करुन लवकर उपचार कसे होतील आणि मृत्यूदर कसा रोखता येईल याबाबत नियोजन करा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून, या नोंदणीनंतरच लसीकरण होणार आहे. त्यामुळे नोंदणीनंतरच केंद्रांवर लसीकरणासाठी यावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात आज आढावा बैठक झाली. ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मृत्यूचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी योग्य नियोजन करुन उपचार करावेत. ज्या रुग्णालयात जास्त मृत्यू झालेत, त्या ठिकाणचे ऑडीट करा. रुग्णांना बेड कसे उपलब्ध होतील, उपचार लवकर कसे होतील ते पहा आणि मृत्यू रोखा.
पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी आॕनलाईन नोंदणी आवश्यक आहे. या नोंदणीनंतरच दिलेल्या सत्रात लसीकरणासाठी यायचं आहे. लसीकरण केंद्रांवर ऑन दी स्पॉट नोंदणी होणार नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी त्यासाठी केंद्रावर गर्दी करु नये.
आरोग्यमंत्री, अन्न व औषध प्रशासनमंत्र्यांशी थेट चर्चा
जिल्ह्यात पुरेसा प्राणवायू आणि रेमडिसिवीर उपलब्ध होण्यासाठी ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ आणि पालकमंत्री श्री. पाटील यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना फोन लावून चर्चा केली. त्याचबरोबर लसीच्या उपलब्धतेबाबतही चर्चा केली. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनाही फोनवरुन संपर्क साधून कोव्हीड काळजी केंद्रात रेमडिसिवीर देण्याबाबत सुधारित निर्देश देण्याबाबत सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, नोडल अधिकारी, डॉ. फारुख देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे आदी उपस्थित होते.