ऑक्सीजन जनरेटर प्रकल्प ठिकाणी विद्युत जनरेटर बसवा – पालकमंत्री सतेज पाटील

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – राधानगरी, मुरगूड, मलकापूर, कोडोली, सी.पी.आर., आय.जी.एम. या ठिकाणी ऑक्सीजन जनरेटर तसेच उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज येथे रिफीलिंग प्रकल्प बसविण्यात येत आहे. या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता तपासून आवश्यकतेप्रमाणे ते बदलावेत, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते. उपस्थित कोल्हापूर मेडीकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पालकमंत्री म्हणाले, मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी नियंत्रण कक्षासाठी सेवा द्यावी, त्याबाबत तीन सत्रात नियोजन करावे.
शहरातील कोविड रूग्णालयात गरजूंना बेड उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय भरारी पथकामार्फत रूग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ज्याला बेडची गरज नाही, अशा रूग्णांना हॉटेलमध्ये व्यवस्था करून रूग्णालयामार्फत उपचार करण्यात येतील, याची जबाबदारी कोल्हापूर वैद्यकीय असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे सांगितले.


जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, शिवाजी विद्यापीठ येथील कोविड रूग्णालयात टास्क्‍ फोर्सने सेवा द्यावी, त्याचबरोबर गृह विलगीकरणातील रूग्णांना रूग्णालयांनी सेवा पुरवावी. रूग्णालयांनी ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करावे. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कोल्हापूर मेडीकल असोशिएशनच्या अध्यक्ष डॉ. आशा जाधव, उपाध्यक्ष डॉ. गीता पिल्लई, सचिव डॉ. किरण दोशी, सल्लागार डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. नीता नरके, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमर आडके, डॉ. शीतल देसाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. मुकुंद मोकाशी उपस्थित होते.

Recent Posts