महाराष्ट्र

लातूरचे ऑक्सिजन संकट आणि अमित देशमुखांनी दाखवलेली समयसूचकता ! लक्ष्मीकांत कर्वा की जुबानी

महाराष्ट्र खाकी (लातूर) – काल लातूर शहरात वेगवेगळ्या घटना घडल्या त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे शहरातील ऑक्सिजन चे संकट जवळ जवळ सर्वच दवाखान्यातील ऑक्सिजन संपल्यात जमा होता. लातूर मधील ऑक्सिजन निर्मिती युनिट मध्ये हि ऑक्सिजन निर्मितीस लागणाऱ्या वस्तूंची कमतरता असल्यामुळे ऑक्सिजन निर्मिती बंद होती सर्व डॉक्टर, जनता, लातूर प्रशासन काळजीत पण लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी समयसूचकता दाखवत हे संकट थांबवले या दिवसभराच्या घडामोडीचा आढावा आणि अनुभव लातूरमधील यशस्वी उद्योजक आणि विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा यांनी मांडला आहे.बुधवार : दि.21.04.2021 वेळ : स.11.15 माझा फोन खणखणला ! कोवीड पॉजिटीव्ह होऊन विवेकानंद हॉस्पिटल मध्ये बेडवर पडलेलो . अशावेळी फोन घेणे जरा कठीणच ! मा. डॉ.कुकडे काकांचा फोन. घाईघाईत ते म्हणाले ” विवेकानंद रुग्णालयात आज दु 5 पर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन आहे. आपल्या रुग्णालयात 70 रुग्ण असून, त्यात 45 जण व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजन वर आहेत. मला जाणीव आहे , तुम्ही बेडवर आहात पण या प्रकरणात तुम्ही लक्ष घालावे . संपुर्ण लातूर जिल्हा हाय अलर्ट वर आहे . पालकमंत्री श्री अमितजी देशमुख यांच्याशी संपर्क करा . मला खात्री आहे तुम्ही यातून मार्ग काढाल .” पायाखालची जमीन हादरली. विवेकानंद रुग्णालयातुनच, तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. माझ्या दवाखान्यातील खोलीला थोड्या वेळासाठी युद्धस्थळाचे स्वरूप आले. ताबडतोब मा. श्री अमितजी यांना फोन केला.

लातूरमधील गंभीर ऑक्सिजन संकटाबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रच्या पुणे FDI विभागाने अगोदरच सर्व टँकर इतरत्र वळवले होते. अवघ्या 15 मिनिटात श्री अमितजींचा मला फोन आला . त्यांनी आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे सांगत आम्हाला आश्वस्त केले. मला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला .मी इतर दवाखान्यात फोन लावले . सर्वांची परिस्थिती गंभीरच होती. थोड्या वेळाने श्री अमितजींचा पुन्हा फोन आला . ” एक ट्रक 12.15 वा. हैद्राबादहुन निघाला आहे .( जो दुपारी 5 वा. लातूरला पोहोचला ) दुसरा ट्रक रात्रीपर्यंत येईल .( जो नुकताच पोहोंचला आणि त्यातून विवेकानंद रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयाला पुरवठा झाला )” चला , तूर्तास लढण्यासाठी बळ मिळाले होते. संपूर्ण रात्रभर विवेकानंद रुग्णालयाच्या स्टाफनी अपुऱ्या ऑक्सिजन वर 45 रुग्णांचे प्राण वाचवले .मी, रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ रात्रभर जागेच होतो. रात्रभर, मला गोळी घेऊन देखील झोप आली नाही.
लातूरच्या नाना गॅस प्लांटचे श्री फटाले सुद्धा रात्रभर जागे होते .पहाटे 2.00 वा . श्री अमितजींना पुन्हा फोन लावला व पुढील पुरवठ्यासंबंधी विचारणा केली .” मी सर्व व्यवस्था केली आहे , आज दुपारपर्यंत लातूरला सुरळीत पुरवठा होईल ” जीव भांडयात पडला ! मला खूप आनंद आहे की 400 ते 500 रुग्णाचे प्राण वाचवण्यात ईश्वराने मला छोटेसे साधन बनवले. मला होणारा आरोग्यविषयक त्रास यापुढे कांहीच नाही.

मा. श्री अमितजी देशमुख यांच्या भगीरथ प्रयत्नाने लातूरवरचे मोठे संकट टळले, हे मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते . एकदा त्यांना परिस्थिती सांगितली की त्यांनी प्रयत्नात कोणतीही कसर ठेवली नाही.
मान गये. खरे पालकमंत्री

अमितजी , तुम्हाला धन्यवाद !

लक्ष्मीकांत कर्वा,
उपाध्यक्ष,
विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान ,
लातूर

Most Popular

To Top