महाराष्ट्र

लातूर पोलीस दलातील धनंजय गुट्टे यांनी आपल्या फोटोग्राफी आणि लेखणीतून पानगावातील पुरातन विठ्ठल मंदिराचा इतिहास मांडला

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्र पोलीस दलातील काही पोलीस आपले कर्तव्य पूर्ण करत आपली आवड पण जपत आहेत आणि त्या आवडीतून समाज उपयोगी कार्य करत असतात अशेच एक पोलीस लातूर पोलीस दलात आहेत त्यांना वाईल्ड फोटोग्राफीची आवड आहे.त्यानीं आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे विठ्ठल मंदिर आहे ते पूर्वाभिमुख आहे . पूर्वेस मुखमंडप , दक्षिणेस आणि उत्तरेस अर्धमंडप असलेला अर्धखुला मंडप , अंतराल आणि गर्भगृह असा त्याचा तलविन्यास आहे . या मंदिरासमोर एक बऱ्यापैकी मोठा मंडप आहे . डॉ . प्रभाकर देव यांच्या मते मुळात त्याचे स्वरूप गोपुर असे असावे . तसे असेल तर या मंडपाला जोडूनच मंदिराची सीमाभिंत असली पाहिजे . गर्भगृहाचा तलविन्यास सप्तरथ असून त्याचे बाह्यांग आणि मंडपाचा अंतर्भाग सूरसुंदरींच्या मूर्तीशिल्पांनी अलंकृत करण्यात आला आहे . मंडपामधील सुरसुंदरींचे स्वरूप हस्तावरील सपाट पट्टीवर असलेल्या मूर्ती असे आहे . होयसळांच्या आश्रयाखाली बांधलेल्या मंदिरांमध्येही अशाच ‘ मूर्ती आढळतात .

तथापि शैलीच्या दृष्टीकोनातून त्या उत्तर चालुक्यांच्या काळातील , म्हणजेच नंतरच्या कर्नाटक शैलीच्या शिल्पांशी मिळत्याजुळत्या आहेत . आधीच नमूद केल्याप्रमाणे मंडप अर्धखुला असून प्रवेश मार्गाचा अपवाद वगळता मंडपाच्या सर्व बाजूंनी वेदिकेच्या वामनभिंती आहेत . वेदिकेच्या बाह्यांगावर आलटून पालटून येणारे अर्धस्तंभ आणि कोष्ठे यांचे अलंकरण आहे . कोष्ठमध्ये नृत्यांगना आणि वादकांच्या मूर्ती आहेत . अर्धस्तंभांवर शिखरे दाखविली आहेत . मंडपाच्या अंतरभागात मंडप एकूण बावीस पूर्णस्तंभांवर आणि आठ वामनस्तंभांवर पेललेला आहे . त्यातील अठरा स्तंभ परिघ भागात आहेत , तर मध्यभागी चार स्तंभ ( चतुष्की ) आहेत . शिवाय मंडपाच्या वेदिकेवर आठ वामनस्तंभ आहेत . स्तंभाचा घटकक्रम त्याच प्रदेशात आढळणाऱ्या स्तंभांसारखा म्हणजे चौरस तळखडा , तीन अष्टकोनी घटकांनी युक्त असलेला खांब , त्यातील प्रत्येक दोन लगतच्या अष्टकोनी घटकांच्या मधोमध वर्तुळाकर घटक , वरच्या बाजूस चौरस घटक , त्यावर उद्गमसदृश घटक , त्यावर भरणी आणि शिरावटी असा आहे . खांबांचा वरचा भाग आणि खांबावरील तुळई यांना जोडणाऱ्या दगडी फळीसारख्या भागावर ( हस्तपट्टावर ) सुरसुंदरीच्या मूर्ती आहेत .

विशेष म्हणजे मंडपाच्या आतील मागच्या भिंतीत अंतरालाच्या द्वाराच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी एक देवकोष्ठ आहे . गर्भगृहाच्या द्वारावर खालच्या भागात शैव द्वारपाल आहेत . एरव्ही हे गर्भगृह आतून साधे सपाट असून त्याचे छतही साधे सपाट आहे . असे छत शिल्पग्रंथांमध्ये समतलवितान म्हणून ओळखले जाते . मंदिरासमोर असलेल्या गोपुरसदृश मंडपात नंदी असल्यामुळे हे मूळचे शैव देवालय असून त्याचे नंतर विठ्ठल मंदिरात म्हणजेच वैष्णव मंदिरात रूपांतर झाले असावे असा डॉ . प्रभाकर देवांप्रमाणे कोणाचाही समज होणे अपरिहार्य आहे . पण गर्भगृहांच्या भद्रांवरील देवकोष्ठातील वैष्णव मूर्ती लक्षात घेता डॉ . देव यांच्या या मताचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे . या मंदिराची वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये आणि शैली लक्षात घेता हे मंदिर इ . स . च्या ११-१२ व्या शतकात बांधले गेले असावे. तसेच मंदिरावर मनमोहक कोरीव काम केलेल्या अनेक सुरसुंदरी पाषाणावर कोरलेल्या आपल्याला पहावयास मिळतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे ऐतिहासिक सौंदर्य जतन होणं गरजेचं वाटतं.

आपली भारतीय संस्कृती अनेक नयनमनोहारी वैशिष्ट्यांनी युक्त असून , आकर्षक मंदिर स्थापत्य हे तिचे ठळक वैशिष्ट्य आहे . भक्तजनांच्या मनातील भक्तिभाव , श्रद्धा व तत्त्वज्ञानातील प्रगती आणि अधोगती या बाबी प्राचीन देवालयांच्या रचनेवरून स्पष्ट होत असतात . त्यादृष्टीने खरे तर आपल्या कीर्तनांचा ( मंदिर ) शास्त्रीय पद्धतीने सूक्ष्मपणे अभ्यास करायचा असतो . त्यामुळेच तर प्रत्येक देवालयांवरी / तील मूर्ती / शिल्पे / कलाकुसर तद्नुरूप भावभावना आणि तत्त्वज्ञान स्पष्ट करण्यासाठीच अनुरूप अशा नाना रूपात विशिष्ट ठिकाणी सिद्धहस्त शिल्पकार विचारपूर्वकच कोरतात . पवित्र देवळातील विविध देवदेवतांच्या मूर्ती पूजनीय असतात . किंबहुना मंदिरात जाणाऱ्या प्रामाणिक भक्तांची तीच तर खरी श्रद्धास्थाने असतात . मंदिरांच्या बाह्यांगावरील सर्व देव वा मूर्ती जरी पूजनीय वाटत नसल्या तरी त्या पाहणाऱ्याला त्याच्या जीवनासाठी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या ‘ सूचक’च असतात .

फक्त प्रेक्षकांच्या निरीक्षणात ‘ कलेची दृष्टी ‘ असावी लागते , एवढेच . मंदिरांच्या बांधकामातील अशा विविध आकार व प्रकारांतील कलाकृतींमध्ये ज्याप्रमाणे देवदेवतांच्या , प्राणी , पशुपक्ष्यांच्या , भौमितिक नक्षींच्या , सर्व वेगवेगळ्या रूपे / स्थिती व धाटणीतील वयोगटातील नर – नारींच्या , शिल्पाकृतींचा समावेश असतो. सुंदरीला विष्णुसारखे केवळ हृदयातच न ठेवता किंवा शिवासारखे अधांगी आसन न देता , सर्वांगाने तिच्याशी समरस व्हावे. असेच काहीसे या मंदिरावर कोरलेल्या सुरसुंदरी विषयी म्हणता येईल. या मंदिरावरील शिल्पांविषयी माहिती साठी लातूर येथील इतिहास अभ्यासक शंकरराव माने गुरुजींची मदत झाली तसेच नांदेड येथील किरण देशमुख सरांच्या “सुरसुंदरी मनात भरली” या पुस्तकाची सुद्धा मदत झालेली आहे. आपल्या या मंदिराचे शिल्पांचे फोटो आवडल्यास नक्की शेयर करा. सोबतची मोफत pdf ईबुक डाउनलोड करा.

https://drive.google.com/file/d/1ACqi1FMO8cA3ssHlgK0Kf-JctcPI1y2E/view?usp=drivesdk

Most Popular

To Top