महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले होते आणि राज्यपालनी राजीनामा स्वीकारला आहे . गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.
स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षम राजकारणी
राजकीय उलथापालथीच्या काळात आणि भाजपकडून आक्रमकपणे हल्ला होत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांना विधीमंडळ कामाच्या आणि कायदेशीर प्रक्रियांच्या खडानखडा माहिती असल्याने आघाडी सरकारला चांगलीच मदत झाली होती. तसेच त्यांच्या सुमारे ५० वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचे किंवा अन्य कसल्याही प्रकारचे आरोप झालेले नाहीत, ही त्यांची अत्यंत जमेची बाजू आहे. सरकारस्थापनेपासून सतत वादग्रस्त ठरलेले अनिल देशमुख यांच्यामुळे सरकार व विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली बदनामी कमी करुन पुन्हा राज्यात प्रतिमा उंचावण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिमेचा त्यांना फायदा होणार आहे.
शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले आहे. दिलीप वळसे पाटील यांचा जन्म ३०ऑक्टोबर १९५६ रोजी झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत. 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली
होती. युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.