महाराष्ट्र खाकी (अमरावती) – दिवंगत साहित्यिक सतेश्वर मोरे यांनी आपल्या साहित्यातून समता, न्याय, मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा हिरीरीने पुरस्कार करत आंबेडकरी साहित्याची चळवळ पुढे नेली व तरुणांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे भान जागविले. ते खऱ्या अर्थाने लढवय्ये व कृतीशील साहित्यिक होते. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना सदोदित प्रेरणा देत राहतील, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिवंगत प्रा. मोरे यांना आदरांजली वाहिली.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज दिवंगत मोरे यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत मोरे यांच्या पत्नी श्रीमती प्रा सीमा मेश्राम -मोरे, तसेच आई, मुलगी व अन्य कुटुंबियांशी संवाद साधून पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रा. मोरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सुदाम सोनोने, बाळासाहेब मेश्राम, प्रवीण मनोहर यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दिवंगत प्रा. मोरे या कवितलेखनाबरोबरच नाटक, समीक्षा, वैचारिक लेखनही सातत्याने केले. लेखनाबरोबरच त्यांनी आंबेडकरी साहित्याची चळवळ पुढे जाण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. अनेक आंबेडकरी साहित्य संमेलने व विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी तरुण साहित्यिकांना प्रोत्साहित केले. त्यांचे प्राध्यापक म्हणून संशोधकीय व अकॅडमिक कामही मोठे आहे. त्यांचे लेखन व विचार तरुणाई व पुढील पिढ्यांना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देत राहील