महाराष्ट्र खाकी ( मुंबई / विवेक जगताप ) – भारतीय पोलीस सेवेतील (भा.पो.से.) वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांनी आज महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. विद्यमान पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला या आज सेवानिवृत्त झाल्या.
नवीन पोलीस महासंचालक कोण असतील, याबाबत गेल्या महिन्यापासून राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने या पदासाठी सात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) शिफारसीसाठी पाठवली होती. यामध्ये राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)चे प्रमुख असलेले सदानंद दाते यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सात नावांपैकी तीन अधिकाऱ्यांची निवड करून त्यांची नावे राज्य सरकारकडे पाठवली. त्या यादीतून अखेर 30 डिसेंबर रोजी सदानंद दाते यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आज त्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला.
अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील प्रकरणांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम व प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


