महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – महाराष्ट्र सरकारने दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिला असून गुरुवारी दहीहंडी उत्सवात सामील होणाऱ्या गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, तसेच काटेकोर नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी केले. राष्ट्रवादी
काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ‘जनता संवाद’ या उपक्रमाला संजय बनसोडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोविंदांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी काटेकोरपणे नियमावली बनविण्यात आली असून त्यात दहीहंडी लावताना हेल्मेट, शक्य तिथे मॅटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गोविंदा
पथकांकडून या नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी गोविंदा समन्वय समिती देखरेख करणार आहे असेही संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. यावर्षी सरकारने 75 हजार गोविंदांचा विमा उतरवला आहे. त्यासाठी 56 लाख 25 हजार रुपये विमा कंपनीला भरले आहेत. तसेच अपघाती मृत्यू झाल्यास, दोन डोळे किंवा अवयव
गमावल्यास, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये, एक हात किंवा पाय, डोळा गमावल्यास 5 लाख रुपयांचा विमा सुरक्षा देण्यात आली आहे असेही संजय बनसोडे यांनी सांगितले.