महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – माझं लातूर परिवार आणि लातूर शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील 500 वारकरी भाविक भक्तांना मोफत पंढरपूर वारीचे दर्शन घडवून आणण्याचा संकल्प करून त्यासाठी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी 10 ट्रॅव्हल्स उपलब्धही करून दिल्या होत्या मात्र गेल्या 4 दिवसात लातूरातील 6
नोंदणी केंद्रावर तब्बल 967 भाविकांनी नोंद केल्याने यापुढील नोंदणी थांबविण्यात आली आहे. ज्या भाविकांनी नोंद केली आहे त्या सर्वांना या उपक्रमांतर्गत मोफत पंढरपूर वारी घडवून आणली जाईल. कोरोना निर्बंधांमुळे गेल्या 2 वर्षात वारकऱ्यांना पंढरपूरला दर्शन घेणे शक्य झाले नाही मात्र यंदा ही संधी माझं लातूर परिवाराने उपलब्ध करून दिली आहे. वारकऱ्यांची गैरसोय
टाळण्यासाठी लातूर शहर आणि परिसरातील नोंदणी केलेल्या सर्वच्या सर्व 967 भाविक प्रवाशांना आता 10 ऐवजी 20 ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मोफत पंढरपूर वारी घडवून आणली जाणार आहे. यासाठी अतिरिक्त 10 ट्रॅव्हल्सची सोय ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी बिनशर्त उपलब्ध करून दिल्याबद्दल माझं लातूर परिवाराने ट्रॅव्हल्स संचालकांचे आभार मानले आहेत. आषाढी एकादशी 10
जुलै रोजी सकाळी 6 वाजता लातुरातील यशवंतराव चव्हाण संकुल, अशोक हॉटेल येथून हे सर्व वारकरी पंढरपूर कडे रवाना होतील. यादरम्यान सर्व भाविक वारकऱ्यांच्या चहापाणी आणि फराळाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. त्याच दिवशी सहभागी प्रवाशी भाविकांना सायंकाळपर्यंत परत लातूरला आणले जाईल. राज्याच्या धार्मिक दृष्टिकोनातून आषाढी एकादशीला खूप
महत्व असून राज्याच्या या सर्वात मोठया उत्सवात लातूरच्या 967 भाविक भक्तांना सहभागी होण्याचे भाग्य लाभणार आहे. यासाठीची संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या भाविक प्रवाशांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असून भक्त प्रवाशांची कसलीही गैरसोय होणार नाही याची काळजी माझं लातूर परिवार घेत आहे. या वारी सोबत माझं लातूर परिवाराचे 40
स्वयंसेवक सेवा देतील अशी माहिती माझं लातूर परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे. मोफत पंढरपूर वारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुगलकिशोर तोष्णीवाल यांची उपक्रम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सोमनाथ मेदगे, जगदीश स्वामी, शफीक चौधरी, वाजीद शेख, योगेश शिंदे यांच्यासह माझं लातूर परिवारातील सर्व सदस्य परिश्रम घेत असल्याची माहिती माझं लातूर परिवाराचे प्रमुख सतीश तांदळे यांनी दिली आहे.