महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – स्त्रीयांच्या कल्याणासाठी आणि न्यायासाठी देशात कायदे आहेत. त्या कायद्याची माहिती शेवटच्या महिलांपर्यंत जावी, जेणे करुन तीचे जगणे अधिक सुसह्य व्हावे हाच तिचा गौरव आहे. 8 मार्च या “ जागतिक महिला दिन” फक्त एक दिवसासाठी तिचा गौरव आणि सन्मान न होता, तिला रोजच सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सवेा प्राधिकरण व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी रोड येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जागातिक महिला दिनानिमित्ताने कायदेविषयक माहिती, प्रचार प्रसिध्दी आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतांना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झाली. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकारण तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या न्या. सुरेखा कोसमकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एस. डी. अवसेकर, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, महाराष्ट्र – गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. अण्णाराव पाटील, जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे आर. डी. काळ, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
न्या. सुरेखा कोसमकर म्हणाल्या की, महिलांचे प्रश्न आजच्या युगामध्ये बदलले आहेत. महिलांच्या बाबतीत समाजात कोणत्याही प्रकारचा भेद करु नये. मुलींना सन्मानाने जन्म देवून तिचं विकासाचं अवकाश मोकळं ठेवावं. महिलांनी स्वत:ला ओळखावं. महिलांना ज्या क्षेत्रात आवड आहे , त्या क्षेत्रात प्रगती करावी. स्वत:साठी जगण्याचा प्रयत्न करावा. स्त्रीया ज्या प्रमाणे पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून कामं करतात, त्याचप्रमाणे पुरुषांनीही त्यांना त्या कामात मदत करावी. महिला दिन इतिकर्तव्यता नाही, तर महिलांना रोजच सन्मानाने वागणूक मिळावी, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच स्त्री पुरुष समानता देण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा वाटा असल्याचे ही न्या. सुरेखा कोसमकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महिलांच्या प्रगतीतून नवीन उर्जा निर्माण होणार आहे. पालकांनी मुलींची स्वत:ची प्रगती साधायची असेल, तर त्यांनी मुलींचे शिक्षण पूर्ण करावे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याचाही त्यांना आत्मविश्वास द्यावा.
महिलांसाठी शासनाच्या विविध योजना विविध यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असतात. या योजनेवर आधारित जिल्ह्यात अधिकाधिक काम करण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यात कांही विषयात म्हणजे 1 हजार मुलींमागे 975 मुलींचा जन्मदर आहे. ही 25 मुलींची तफावत भरुन काढण्यासाठी यावर काम करणे आवश्यक आहे.
तसेच मुलींचे शिक्षण किमान बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यासच मुलीच्या विवाहाचा विचार करावा यातून बालविवाहाचे प्रमाण कमी करण्याकडे आपण जावू. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ज्या घरांचा आधार गेला आहे, त्यांच्या जाणाने घरचा सर्व भार त्यांच्यावर येवून ठेपला अशांसाठी सुध्दा शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. याबरोबरच आत्महत्या ग्रस्त, शेतकऱ्यांच्या कुटूंबांना मनरेगातंर्गत विहीरी मंजूर करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे पत्र सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना नुकतेच देण्यात आलेले आहे. येत्या कालावधीत याची अंमलबजावणीही होणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
महिला व बाल कल्याण भवन उभारणार
महिला व बाल विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. महिला व बाल कल्याण भवन उभेण करणार असून त्यात महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारला जाणार आहे. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात स्त्रीयांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे श्रीमती एस. डी. अवसेकर म्हणाल्या की, मुलां-मुलींमधील भेदभाव टाळावा. त्यांना समान वागणूक द्यावी. भेदभावामुळे अनेक प्रथा होत आहेत. जसे हुंडाबळी, बालविवाह यावरही मार्गदर्शन केले. महिलांनी कायदे विषयक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महिलांसाठी तत्परतेने कार्य करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे म्हणाले की, स्त्री ही सहनशिल असून त्यामुळे स्त्रीला दुय्यमत्वाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर जाचक अटी लादल्या जातात आणि त्यांच्यावर अन्याय होत असतो. स्त्रीकडे स्त्री म्हणून न पाहता ती एक व्यक्ती म्हणून पहावं, असेही श्री. लोखंडे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखी वन स्टॉपच्या सदस्य ॲङ सुजाता माने यांनी केले. यावेळी जिल्हा विधीज्ञ मंडळाचे आर. डी. काळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
विशेष कार्य करणाऱ्या बी.एल.ओ.चा सन्मान
निवडणुकीमध्ये बी.एल.ओ.चे काम अत्यंत महत्वाचे असते, यात अत्यंत तळमहीने काम करणाऱ्या बी.एल.ओ. यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.