गोंदिया शासकीय मेडिकल कॉलेजचे विद्यार्थ्याना हॉस्टेल पडतय कमी

महाराष्ट्र खाकी (गोंदिया) – गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊन सहा वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र नविन प्रवेशित MBBS विद्यार्थ्यांच्या निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने या वर्षी प्रथम वर्षात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न महाविद्यालय प्रशासनासमोर आहे. गोंदिया जिल्ह्यासह शेजारील मध्यप्रदेश व छत्तीसगढ सिमावर्ती गावातील रुग्णांसाठी शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालय हे गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देता आहेत. गोंदिया जिल्ह्यावासीयांसह या क्षेत्रातील नागरिकांना अधिक चांगली आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाने गोंदियात 2014 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली.

मात्र प्रत्यक्षात 2016 पासून महाविद्यालयाचे कामकाज सुरु झाले. भावी डॉक्टरांच्या प्रशिक्षणासह रुग्णांवर उपचार येथे सुरु झाले. सुरुवातीला MBBS अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात 100 जागा विद्यार्थ्यांसाठी आरक्षीत करण्यात आल्या. त्यानंतर मागील दोन वर्षापूर्वी त्यात वाढ करुन 150 जागा आरक्षीत करण्यात आल्या. उल्लेखनीय म्हणजे, हा अभ्यासक्रम साडेपाच वर्षाचा असल्याने विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय महाविद्यालय परिसरात असणे अपेक्षित आहे.

त्यादृष्टीने महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसाठी निवास तयार करण्यात आले आहे. आजघडीला विद्यार्थ्यांसाठी 650 विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था महाविद्यालय प्रशासनाजवळ आहे. मात्र ते आजघडीला अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. दरवर्षी प्रवेशित होणार्‍या विद्यार्थ्यांमुळे आजघडीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पर्याप्त निवास व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी यंदा जानेवारी महिन्यात MBBS च्या प्रथम वर्षात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न महाविद्यालयासमोर असून ते विद्यार्थ्यांच्या निवासासाठी पर्यायी व्यवस्था शोधत असल्याची माहिती आहे.

 

Recent Posts