महाराष्ट्र खाकी (लातूर) – काही दिवसापूर्वी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील ICU विभागाला आग लागली होती या दुर्घटनेत खूप मोठी जिवीत हाणी झाली होती, या घटनेने राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात दक्षता घेतली जावी असे आदेश प्रशासनाने काढले होते. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय या ठिकाणी आग लागल्याची बातमी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती.
याची दखल घेत लातूरचे कर्तव्यदक्ष महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. या ठिकाणी कसलीही आगीची घटना घडलेली नाही. अतिदक्षता विभागाच्या शेजारी असणाऱ्या नर्सिंग रूम मध्ये देवाच्या फोटो पुढील दिव्यामुळे कागदांनी पेट घेतल्याने थोडासा धूर निर्माण झाला. महाविद्यालयाच्या वतीने नव्याने बसविण्यात आलेल्या अलार्म सिस्टीम आणि स्मोक डिटेक्टरचा अलार्म वाजल्याने हा प्रकार लागलीच निदर्शनास आला.
यावेळी डॉक्टर, अधिष्ठाता, नर्सेस यांनी खबरदारी घेत त्या ठिकाणी असणाऱ्या दाखल रुग्णांची काळजी घेतली. मात्र मोठी आग कोठेही लागलेली नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असे महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले . त्याबरोबरच कोणालाही कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. सर्व बालके सुखरूप आहेत.