छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रेरणेतूनच सरकारचे कार्य चालू आहे – पालकमंत्री सतेज पाटील

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रेरणेतूनच राज्य सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करीत असून भविष्यात महाराजांच्या विचारानेच महाराष्ट्र निश्चितपणे प्रगती पथावर जाईल, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ‘शिवस्वराज्य दिन’ उत्साही, मंगलमय, भारावलेल्या वातावरणात तसेच शिवकालीन तुतारीच्या निनादात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात आली त्यानंतर कोविड योध्दा स्वर्गीय सुरेश देशमुख (परिचर) यांच्या कुटुंबियाना शासनातर्फे 50 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रकर्त्या डॉ. अल्पना चौगुले यांचा सत्कार पालकमंत्र्यांनी केला. संचालक आरोग्य सेवा (मुंबई) यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 9 रुग्ण्वाहिका देण्यात आल्या. या रुग्ण्वाहिकांच्या चालकांना श्री. पाटील यांच्या हस्ते चाव्या प्रदान करण्यात आल्या.


तत्पुर्वी गिरगाव (ता. करवीर) गावातील फिरंगोजी शिंदे नाईक याच्या पथकाने शिवकालीन मर्दानी खेळाचे सादरीकरण केले तर बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील प्रदीप सुतार व त्यांच्या साथीदारांनी आपल्या दमदार आवाजात शिवरायांचा पोवाडा सादर केला.


राज्य शासनाच्या निर्देशानुसार तसेच कोविड-19 नियमाचे पालन करुन ‘शिवस्वराज्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जि.प उपाध्यक्ष सतीश पाटील, आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रविण यादव, समाज कल्याण सभापती श्रीमती स्वाती सासणे, महिलाबाल कल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, संजय अवघडे यांच्यासह, जि.प.चे इतर अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Recent Posts