लातूरचे मा.खा. डॉ. सुनील गायकवाड यांना “क्रांतिकारी धम्मरत्न” पुरस्कार

महाराष्ट्र खाकी ( पंढरपूर / प्रतिनिधी )  – बौद्ध धम्म चळवळीला नवी दिशा देणारे ज्येष्ठ समाजकार्यकर्ते डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना २०२६ सालचा मानाचा “क्रांतिकारी धम्मरत्न” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. “चला बुद्धाच्या घरी” या बौद्ध धम्म चळवळीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संत दामाजी पंत सभागृह येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या वेळी अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, धम्मप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी डॉ. गायकवाड यांच्या गेल्या अनेक दशकांतील धम्मसेवेचा गौरव करत त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली.

खासदार म्हणून कार्यरत असताना डॉ. गायकवाड यांनी लोकसभेत पाली विद्यापीठ स्थापनेची मागणी केली होती. तसेच केंद्रीय यूपीएससी परीक्षेत पाली भाषा समाविष्ट करण्यासाठी त्यांनी ठोस भूमिका मांडली. या प्रयत्नांमुळे पाली भाषा आणि बौद्ध संस्कृतीच्या जतनासाठी नवे मार्ग खुले झाल्याचे मानले जात आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून धम्म चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ. गायकवाड यांनी देशभरात बौद्ध विहार उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. सध्या अजिंठा लेणी परिसरात पाली विद्यापीठ स्थापनेसाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून, या उपक्रमामुळे जागतिक स्तरावर बौद्ध अभ्यासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली गेली असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Recent Posts