महाराष्ट्र खाकी ( बीड / प्रतिनिधी ) – बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची नुकतीच अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. 23 डिंसेबर रोजी सायंकाळी मस्साजोग येथे जाऊन दिवंगत संतोष देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. देशमुख कुटुंबीय अजूनही दहशतीखाली आहेत, त्यामुळे त्यांना ताबडतोब पोलीस
संरक्षण देण्यात यावे अशी मागणी, आमदार देशमुख यांनी केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या सूचनेवरून मराठवाडा, सोलापूर येथील खासदारांसह आम्ही आज मसाजोग येथे देशमुख कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलो आहे, असे सांगून या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही अमित देशमुख यांनी या
भेटीनंतर पत्रकारांसॊबत बोलताना सांगितले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिले आहे, असे असले तरी या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या संदर्भाने लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या
वतीने सरकारवर दबाव आणणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्व. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अजूनही दहशतीखाली आहेत त्यामुळे त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली.