महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीची कार्यवाही 235 – लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. या कार्यवाहीची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी पाहणी केली.
आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या 72 तासांत होत असलेले कार्यवाहीची बुधवारी सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, मनपा उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस विभाग,
मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पहिल्या 24 तासांमध्ये विविध बॅनर, भित्तीपत्रके, पोस्टर्स, फ्लेक्स, कट आऊट्स काढण्यात आले आहेत. तसेच शासकीय कार्यालयात प्रदर्शित केलेले नामफलक, कोनशिला, उद्घाटन फलक आदी स्वरुपातील बाबीमुळे आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी असे फलक झाकण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर शहर
विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. नियम मोडल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याने कोणीही आचारसंहितेचे उल्लंघन करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती रोहिणी नऱ्हे यांनी यावेळी केले.