महाराष्ट्र खाकी ( नांदेड / प्रतिनिधी ) – केंद्रीय निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार नोंदणी करावी यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासाठी
“माझ मत माझ भविष्य” हे अभियान हाती घेतले आहे. या निमित्ताने नांदेड येथील महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबी कॅम्पस ला भेट देऊन 17 वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी विषयी मार्गदर्शन केले. 17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनाही आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा
उपलब्ध असून त्यासाठी त्यांना 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 18 वर्षे पूर्ण झाले आहेत अशा नवमतदारांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला जात असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते वाढदिवस असलेल्या
आयआयबी च्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. 17 वर्ष पूर्ण असलेल्या उर्वरित आयआयबी च्या विद्यार्थ्यांची नोंदणी आयआयबी व्यवस्थापन करून घेईल असे आश्वासन आयआयबी चे संचालक दशरथ पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच मतदान जागृती साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर घेऊन प्रोत्साहित केले
जाईल आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपक्रमास आयआयबी ची साथ! असल्याचे त्यांनी सांगितले. माझी वसुंधरा अभियानातील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेले तसेच भारत सरकारचा बेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार व इतर
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार अभिजित राऊत यांना मिळाले आहेत. अभिजित राऊत हे 2013 बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. यावेळी त्यांनी आयआयबी कॅम्पसला भेट देऊन आयआयबी चे सूक्ष्म नियोजन, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबर आयआयबी च्या सुरक्षा व्यवस्थेची विशेष पाहणी केली.