सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून संवेदनशीलपणे आणि एकोप्याने काम करूया – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – महसूल विभाग हा प्रशासनातील सर्वात महत्वाचा विभाग आहे. त्यामुळे शासनाच्या सर्वाधिक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ह्या विभागाकडे असून सर्वसामान्य जनतेच्या जीवनाला स्पर्श करणारा हा विभाग आहे. त्यामुळे महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून संवेदनशीलपणे आणि संवादात्मक होवून एकोप्याने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

यांनी केले. महसूल दिनी लातूर येथील भक्ती शक्ती मंगल कार्यालयात आयोजित महसूल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कृष्णा चावरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, डॉ. सुचिता शिंदे, गणेश महाडिक,

नितीन वाघमारे, प्रियांका कांबळे, अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, रोहिणी नऱ्हे-विरोळे, प्रवीण फुलारी, प्रतीक्षा भुते, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, सर्व तहसीलदार यावेळी उपस्थित होते. ‘संवादात्मक आणि संवेदनशील प्रशासन’ – निवडणूक ते नैसर्गिक आपत्ती या प्रत्येक बाबतीत महसूल विभागाची प्रमुख भूमिका आहे. सर्वसामान्य जनतेला योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मनातील प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी कार्यालयात

समस्या घेवून येणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद ठेवून, त्यांची तक्रार केवळ कागद म्हणून न वाचता ती तक्रार मानवी दृष्टीकोन ठेवून समजून घेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. ‘संवादात्मक आणि संवेदनशील प्रशासन’ अशी प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रशासनाची जनतेच्या मनातील प्रतिमा उंचाविणे, हाच आपल्यासाठी खरा पुरस्कार असेल, अशी भावना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण, गतिमान प्रशासनासाठी प्रयत्न – जिल्ह्यात जलव्यवस्थापन, ‘गाव तिथं

स्मशानभूमी’ आणि ‘कुटुंब तिथं वृक्ष’ मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन गतिमान, गुणवत्तापूर्ण बनविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून गतिमान आणि संवेदनशील प्रशासनाची अपेक्षा व्यक्त करताना त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. ‘माझे

कार्यालय, सुंदर कार्यालय’ संकल्पना राबवा – महसूल सप्ताह कालावधीत सर्व कार्यालयांमध्ये ‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ संकल्पना राबवून आपले कार्यालय स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनविण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत,असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी सांगितले.तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक प्रश्नांचा आस्थापूर्वक विचार करून या प्रश्नाचा निपटारा केला जाईल. महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

Recent Posts