महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके) – संतांचा फक्त जयघोष आणि उदोउदो करण्याची मराठी साहित्य आणि साहित्याकांची वृत्ती आहे आणि ते एक प्रकारचे थोतांड आहे, प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचे अनुकरण ते करतच नाहीत. पर्यावरणीय लेखनात संशोधन करून ते लोकांसमोर मांडण्याची मराठी साहित्यिकांची वृत्ती नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणाचे अभ्यासक
अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी (दि. 23 एप्रिल) छत्रपती शाहू महाराज सभागृहात डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ येथे आयोजित ‘मराठी साहित्यात निसर्गचित्रणच आहे, पर्यावरण नाही’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कोल्हापूरचे गोमटेश्वर पाटील, औरंगाबादचे अनिरुद्ध मोरे, प्रा. डॉ.
किरण वाघमारे, डॉ. अनिता तिळवे तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे आणि संमेलन समन्वयक रमेश अंबरखाने व्यासपीठावर होते. देऊळगावकर म्हणाले, माणूस आणि पर्यावरणाची फारकत झाली आहे. ती का झाली याचा शोध घेण्याची गरज आहे. जगभरातील पर्यावरण तज्ञांनी पुढील पिढीला हरित वने बघायला मिळतील की नाही, अशी शंका त्यांच्या साहित्यातून
उपस्थित केलेली आहे. इतर प्राण्यांना आणि निर्जीव वस्तूंना या जगात राहण्याचा अधिकारच नाही अशा अविर्भावात माणूस जगत आहे. त्यामुळे तो निसर्गाला ओरबाडून संपवायला निघाला आहे. जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या तर यात आघाडीवर आहेत. आधी मानवाला निसर्गाचा आदर करायला शिकवायला हवे. संस्कृती आणि निसर्गाचा ऱ्हास हातात हात घालून चालले आहेत.
आपल्या प्रगतीच्या व्याख्येत किंवा मॉडेलमध्येच काहीतरी खोट आहे. मराठी साहित्यिक निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर लिहिताना केवळ स्वतःच्या अनुभवाचा आणि जीवनाचा विचार करतो, त्यापलीकडे जाऊन पर्यावरणावर संशोधनात्मक लिखाण होत नाही. परखड असले तरी सत्य हेच आहे. गोमटेश्वर पाटील म्हणाले, जगभरातील आणि मराठी साहित्यात सौंदर्यवाद आहे, परंतु निसर्गवाद
नाही. साधारण 1978 पासून पर्यावरणविषयक चळवळ जगभरात दिसून येते. मध्ययुगात, संत युगात आपल्याकडे निसर्ग वर्णने दिसतात. कादंबरीतही निसर्ग वर्णने आहेत, मात्र त्यांचा उपयोग केवळ कथानक पुढे नेण्यासाठी होतो. तो पुरेसा नाही. पर्यावरणीय जाणीवेतून निसर्गाचा उल्लेख साहित्यात व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून अनिरुद्ध मोरे म्हणाले की, झाडाला देवत्व देण्याची गरज नसून, त्यांची
आपल्याला जैविक गरज आहे. मराठी साहित्यात निसर्गाचा उल्लेख आहेच, मात्र तो पर्यावरणीय जाणीवेतून होण्याची गरज आहे. प्रा. डॉ. किरण मोरे म्हणाले की, मराठी साहित्यात निसर्गाचे चित्रण आहे, तसेच ते पर्यावरणाचेही आहे. मात्र त्याकडे आपले लक्ष जात नाही. लीळाचरित्रापासूनच चक्रधर स्वामींनी पर्यावरणाचा विषय समाजासामोर मांडला आहे. तर डॉ. अनिता तिळवे यांनी
भारतीय संस्कृतीतील पर्यावरण आणि झाडांचे महत्त्व अधोरेखित केले. संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ना. संजय बनसोडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मनोगत व्यक्त केले. प्रत्येक माणूस पर्यावरणवादी झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपल्या मतदारसंघात त्यासाठी उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.