महाराष्ट्र

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचे आयोजन

महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके ) – भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘लेखक आणि लोकशाही मूल्ये’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी प्रसिध्दी

पत्रकान्वये कळविले आहे. निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही रसरशीत राहावी, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत असतात. सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारा एक महत्वाचा घटक असतो. लेखक आणि त्याची लेखणी. लेखकांची हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून या परिसंवादात पर्यावरण-अभ्यासक

अतुल देऊळगावकर, साहित्याचे अभ्यासक दिलीप चव्हाण, शिक्षण-अभ्यासक हेमांगी जोशी, नाटककार राजकुमार तांगडे, अनुवादक सोनाली नवांगुळ, पत्रकार हलिमाबी कुरेशी आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
या परिसंवादाचे संवादक मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार आहेत.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 एप्रिल 2022 रोजी सायं 5 वा. आयोजित सदर परिसंवादाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या Chief Electoral Officer, Maharashtra या संकेतस्थळावरून आणि फेसबुक, ट्विटर, यूट्युब, इन्स्टा या समाजमाध्यमांवरूनही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या संमेलनात मतदारांच्या जनजागृतीसंबंधी प्रकाशने, मतदार नोंदणी,

शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेळ यांचे दालनही असणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. ही व्यासपीठे शाळा – महाविद्यालये,
गावा-परिसरामध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकही या दालनात

उपलब्ध असतील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारा प्रकाशित आणि डॉ. दीपक पवार संपादित ‘लोकशाही समजून घेताना’ हे 545 पृष्ठांचे पुस्तक अवघ्या रुपये 150 या सवलत दरात उपलब्ध असणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांबरोबरीने विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनाला भेट देऊन लोकशाहीसंबंधीचे ल्युडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून

घ्यावेत, तसेच नव्याने पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

Most Popular

To Top