महाराष्ट्र

ग्रामीण भागात वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी सौ. दीपशिखा देशमुख यांची नाविन्यपूर्ण “रीड लातूर” संकल्पनेत आमदार धिरज देशमुख यांचा पुढाकार

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – मोठ्या शहरांत सहज उपलब्ध होणारी आधुनिक विषयांवरील पुस्तके ग्रामीण भागातील मुला-मुलींपर्यंत पोचावीत यासाठी सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या पुढाकाराने आकाराला आलेल्या ‘रीड लातूर’ या ग्रंथालयाचा ‘श्रीगणेशा’ विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 6 ) होणार आहे.

 

‘लातूर ग्रामीण’चे आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भादा (ता. औसा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने इतर गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

 

भविष्यात ग्रामीण भागात अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून या ग्रंथालयाचे स्वरूप फिरते ठेवण्यात आले आहे. ठराविक कालावधीनंतर हे ग्रंथालय एका शाळेतून दुसऱ्या शाळेत स्थलांतरीत होणार आहे. यात गोष्टींच्या पुस्तकांबरोबरच आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण, प्रेरणादायी कथा-कविता अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना असणार आहे.

 

या ग्रंथालयासाठी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, सोनाली बेंद्रे, सोहा अली खान, लारा दत्ता, नीलम कोठारी, ताहिरा कश्यप, लेखक रुस्किन बॉण्ड, ड्रीमलॅण्ड पब्लिकेशन अशा अनेक मान्यवर व्यक्ती आणि संस्थांनी उत्स्फूर्तपणे पुस्तके देऊन या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे. भविष्यात या उपक्रमात लोकसहभाग वाढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन पुस्तकरूपाने मदत करावी. त्यासाठी 8390311111 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रीड लातूर टीमच्या वतीने करण्यात आले आहे.

 

वाचनातून व्यक्तिमत्व बहरेल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आहे. वाचनाबाबत त्यांच्या मनात उत्सुकता आहे. पण, त्यांच्यापर्यंत मोठ्या शहरात किंवा मोठ्या शाळांत सहज उपलब्ध होणारी नवनवीन पद्धतीची,आधुनिक पुस्तके पोचत नाहीत. याचा विचार करून सौ. दीपशिखा देशमुख यांनी ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढवण्याबाबतची कल्पना आमदार धिरज देशमुख यांच्याकडे मांडली. यातून ‘रीड लातूर’ हा अनोखा उपक्रम पुढे आला. या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक शाळांत ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना दर्जेदार पुस्तक वाचनाचा आनंद मिळेल आणि त्यांचे व्यक्तिमत्व बहरण्यास मदत होईल.

 

भादा येथे शुभारंभ सोहळा

‘रीड लातूर’ या उपक्रमाअंतर्गत सुरू होणाऱ्या ग्रंथालयाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल यांच्या शुभहस्ते व सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील भादा जिल्हा परिषद प्रशाला येथे बुधवारी (ता. 6) सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती पी. व्ही. फुटाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

Most Popular

To Top