महाराष्ट्र खाकी (कोल्हापूर) – दुबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘दुबई आयर्न मॅन 2022’ 112.9 कि.मी.च्या स्पर्धेत 100 देशातील सुमारे 2,500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश शांताराम चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस उपअधीक्षक म्हणून ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत.
मंगेश चव्हाण यांनी ‘दुबई आयर्न मॅन 2022’ स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे कोल्हापूरच्या पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मंगेश चव्हाण हे मूळचे सातारा येथील रहिवासी असून, सध्या ते कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
‘दुबई आयर्न मॅन 2022’ ही स्पर्धा नुकतीच दुबई येथे पार पडली. एकूण 112.9 किमीचे अंतर चव्हाण यांनी अवघ्या साडेसहा तासात पूर्ण केले. यामध्ये 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21 किमी धावणे अशा प्रकारात हे अंतर साडेआठ तासात पूर्ण करायचे होते. सुमारे 36 डिग्री तापमान सहन करीत हे अंतर त्यांनी कमी वेळेत पूर्ण करून कोल्हापूरचे नाव उंचावले.
कोल्हापुरात तलाव व रस्ते चांगले असल्यामुळे ‘आयर्न मॅन’ स्पर्धेच्या सरावासाठी योग्य वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहारे व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
