महाराष्ट्र खाकी ( नागपूर ) – वैद्यकीय शिक्षकांचे सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने आणि मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी वैद्यकीय शिक्षकांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनाच घेराव घातला. तब्बल अर्धा तास अधिष्ठातांना खुर्चीत बसून केवळ महिला डॉक्टरांचे म्हणणे एकावे लागले.शासनाने करमरकर समितीच्या शिफारशी लागू न केल्यास येत्या 14 मार्चपासून आंदोलनाचा उद्रेक होईल, असा इशारा महाराष्ट्र मेडिकल टिचर्स असोसिएशनतर्फे देण्यात आला.मेडिकलमध्ये 5 जानेवारीला 160 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांनी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याकडे पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा सादर केला.
यानंतर सातत्याने आंदोलन सुरू आहे. सोमवारी केलेल्या घंटानादानतर मंगळवारी ( दि.8 ) महिला दिनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना महिला डॉक्टरांनी घेराव केला.करमकर समितीने वैद्यकीय शिक्षकांचे विविध भत्ते वाढवण्यासह विविध शिफारशी केल्या आहेत, मात्र शासनाकडून अंमलबजावणी होत नाही. यामुळे राज्यात सर्व मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापक यांना
मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतो. वैद्यकीय शिक्षकांच्या भत्त्यांमध्ये वाढ होत नसल्यामुळे सामान्य प्राध्यापकांच्या बरोबरच वेतन मिळते. यामुळेच संतप्त झालेल्या वैद्यकीय शिक्षकांकडून पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा दिला. प्रशासकीय कामकाज थांबवले, घंटानाद केला, मात्र तरी शासन यांच्या मागण्याला भीक घालत नाही, यामुळेच आता रुग्णसेवा थांबवण्याशिवाय पर्याय नाही, असा पवित्रा घेतला आहे, असे महाराष्ट्र स्टेट मेडिकल टिचर्स असोसिएशनतर्फे कळविण्यात आले.