आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश, चिंचोली (पळसगाव) साठवण तलावाच्या उर्वरित कामासाठी 24 कोटी रु. मंजूर

 

महाराष्ट्र खाकी (उमरगा) – उमरगा – लोहारा चे लोकप्रिय आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. हे त्यांच्या कार्यातून जनतेला दिसून येते. आमदार चौगुले यांच्या अशाच एका विकास कामाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. चिंचोली पळसगाव साठवण तलाव ता.उमरगा येथील उर्वरित कामासाठी सुमारे 24 कोटी रु. निधीच्या द्वितीय प्रशासकीय मान्यतेस नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. चिंचोली पळसगाव साठवण तलावाच्या कामास सन 1999 साली उमरगा-लोहारा विधानसभेचे तत्कालीन आमदार प्रा.रवींद्र गायकवाड व तत्कालीन जलसंपदा सचिव व्यंकटरावजी गायकवाड यांच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली होती. यानुसार सदर काम पूर्ण करण्यात येत होते, परंतु यावेळी पळसगाव तांड्याचे पुनर्वसन अर्धवट राहिल्याने सन 2002 पासून सदर काम अर्धवट स्थितीत राहिले होते.

दरम्यानच्या काळात सदर कामासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाचा खर्च हा मूळ प्रशासकीय मान्यतेपेक्षा जास्त होत गेल्याने सदर काम हे निधीच्या कमतरतेमुळे अर्धवट स्थितीतच राहिले होते. दरम्यान सन 2018 साली आमदार ज्ञानराज चौगूले यांनी कृष्णा खोरे विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता सुदर्शन पगार, यांच्या सोबत प्रकल्प दौरा करून कामाचे सुधारित अंदाजपत्रक शासनाकडे सादर करणेबाबत सूचना केल्या होत्या. या अनुषंगाने तत्कालीन शाखा अभियंता शांत मोरे, यांच्यावर या कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली व यानुसार सदरचे अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात आले.

यानुसार कृष्णा खोरे महामंडळ व जलसंपदा विभागाकडे वेळोवेळी संबंधित अधिकारी व मंत्रीमहोदय यांच्यासमवेत पाठपुरावा करून या प्रकल्पाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली. या सर्व बाबींचे फलित म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दि.25 जानेवारी 2022 रोजी या कामास द्वितीय प्रशासकीय मान्यता देऊन सुमारे 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याअंतर्गत न्यायालयीन प्रक्रियेसह संपूर्ण भूसंपादनासाठी जवळपास 13 कोटी रु. राखीव ठेवले असून उर्वरित 11 कोटी रुपयांत साठवण तलावाचा खुला ठेवण्यात आलेला सांडवा बंद करून घेतला जाणार आहे. यामुळे 1.50 मी. ने पाणीसाठा वाढणार असून पळसगाव, गुंजोटी, नागराळ, एकोंडी ज., आदी गावातील सुमारे 1500 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.

20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे व पालकमंत्री शंकरराव गडाख तसेच याकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबाबद्दल जलसंपदा विभागाचे माजी प्रधान सचिव व्यंकटराव गायकवाड, मा.खा.रवींद्र गायकवाड यांचे आणि याकामी सर्व प्रशासकीय व तांत्रिक बाबीची वेळोवेळी पूर्तता केल्याबद्दल जलसंपदा विभाग व कृष्ण खोरे महामंडळाचे सर्व अधिकारी यांचे आमदार ज्ञानराज चौगूले यांनी आभार मानले.

 

Recent Posts