महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध झाले म्हणजे श्रेय मिळवले हे सिद्ध होते का? राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा भाजप नेत्यांना सवाल

परळीतल्या रस्त्यांची काळजी करू नका, ते पूर्ण करूच; नगर पालिका ताब्यात नसताना सत्ताधारी बनून छळलेलं आणखी परळीकर विसरले नाहीत – धर्माधिकारी यांचे भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

माजी पालकमंत्री यांच्या महामार्ग विकासाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे परळी-अंबाजोगाई रस्ता – धर्माधिकारी यांचा टोला

महाराष्ट्र खाकी ( परळी ) – बीड जिल्ह्यातील परळी ते सिरसाळा मार्गे बीड या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यासह जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांना 2020-21 मध्येच मंजुरी मिळालेली असून आता यापैकी काही कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत, मंजुरी नेमकी कधी मिळाली कदाचित याचीही सुतराम कल्पना नसलेल्या भाजप नेत्यांनी कामांची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर या कामाचे श्रेय आमचेच आहे, असा श्रेयवाद करणे केविलवाणे आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर तुमचे सरकार केंद्रात आहे, म्हणून ही कामे तुम्ही आणली, असे सिद्ध होते का? असा सवाल श्रेयवादी भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी उपस्थित केला आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या कामांना मंजुरी मिळावी, प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला, त्याचे पुरावे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत. मार्च 2020 मधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांसाठी झालेली बैठक देखील जगजाहीर आहे, असे असताना निविदा निघाली म्हणून श्रेय घेणाऱ्या नेत्यांनी आपल्या नेतृत्वाने याबाबत केलेल्या पत्रव्यवहार, केंद्रीय नेतृत्वासोबत घेतलेल्या बैठका याचे पुरावे देऊन, श्रेयवाद केला असता, तर नवल वाटले नसते, असा टोलाही श्री. धर्माधिकारी यांनी लगावला आहे.

माजी पालकमंत्री यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात झालेले जाळे नेमके कुठे आहे हा संशोधनाचा विषय असून, पाच वर्षात पूर्ण न होऊ शकलेला परळी अंबाजोगाई रस्ता हा त्याचे सर्वोत्तम उदाहरण असल्याची मिश्किल टिप्पणी श्री. धर्माधिकारी यांनी केली आहे. विशेष म्हणजे पाच वर्षात खोदून ठेवलेला तो रस्ता देखील धनंजय मुंडे यांनाच पूर्ण करावा लागला असल्याचाही उल्लेख धर्माधिकारी यांनी केला आहे.

दरम्यान परळी शहरातील रस्ते व भुयारी गटार योजनेच्या कामांच्या माध्यमातून परळी शहराचे रूप पालटण्याचे काम धनंजय मुंडे यांनी हाती घेतले आहे. या दरम्यान ज्यांना सध्या अर्धवट अवस्थेतील काम सुरू असलेले रस्ते दिसत आहेत त्यांना रस्त्यांच्या व भूमिगत नाल्यांच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर परळीचे स्वप्न दिसत नाही, त्यांना फक्त आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन टीका करायला वाव हवा असतो, असेही बाजीराव धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

परळी शहरातील नगर परिषदेत सत्ता नव्हती म्हणून, माजी पालकमंत्री यांनी त्यांच्या सत्ता काळात परळी शहराला येणारा निधी अडवला, केवळ सत्ता नाही म्हणून शहराच्या विकासात आडकाठी घातली, हे परळीतील जनता अजूनही विसरली नाही, त्यामुळेच कदाचित शहरातून मागील नगर परिषद निवडणूक व विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी शहरातील जनता उभी राहिली.

शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी शहरातील जनता भक्कमपणे उभी आहे, त्यामुळे भाजप नेतृत्वाने इथल्या रस्त्यांची काळजी करू नये, ते आम्ही अत्यंत दर्जात्मक पद्धतीने पूर्ण करणारच आहोत, असेही बाजीराव धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

परळी मतदारसंघाचा चेहरा बदलतोय

धनंजय मुंडे यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात सातत्याने कोविडची आव्हानात्मक परिस्थिती असताना देखील त्यांनी मतदारसंघातील प्रमुख कामांना गती दिली. परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले. एमआयडीसीचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध होऊन जमीन अधिग्रहित झाली. परळी शहर बायपासचे काम सुरू झाले. परळी ते धर्मापुरी, परळी ते घाटनांदूर मार्गे पानगाव रस्त्याचे काम सुरू झाले. वैद्यनाथ मंदिर परिसरात भव्य भक्त निवास उभारण्यात येत आहे.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सिरसाळा येथे भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी सुरू आहे, शहरात हज हाउस झाले, तीन आकर्षक उद्याने पूर्णत्वाकडे जात आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मतदारसंघात 20 गावे प्रमुख रस्त्यांशी जोडण्याचे काम सुरू झाले. नवीन 33 केव्ही केंद्र उभारणीचे काम देखील सुरू आहे.

केवळ इतकेच नाही तर धनंजय मुंडे यांनी संपूर्ण यंत्रणा कामी लावून कोविडच्या दोन्ही लाटांमध्ये परळी मतदारसंघातील जनतेसाठी सेवेचा अखंड यज्ञ तेवत ठेवला. मतदारसंघातील हजारो कुटुंबांना रेशन पासून रेमडिसिव्हीर पर्यंत मदत केली. त्यावेळी भाजपचे नेतृत्व मात्र मुंबई वासी होते, असेही बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

Most Popular

To Top