महाराष्ट्र

लोक अदालत वसुलीचे केंद्र बनु नये – विधी जागृती अभियान

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात लोक अदालत चे आयोजन केले जाते. पक्षकारांना त्वरित न्याय, खर्च व वेळ टाळणे, तसेच न्याय व्यवस्थेवरील प्रकरणाचा ताण व बोजा कमी व्हावा या उदात्त हेतूने सुरू झालेली लोक न्यायालयाची संकल्पना गेली काही दिवसांपासून गुणात्मक बाबी ऐवजी संख्यात्मक बाबी कडे झुकलेली आहे. प्री लिटीगेशनच्या माध्यमातून विविध सार्वजनिक सेवांचे देयके म्हणजेच वीज, पाणी, तसेच वाहतूक पोलीस, आरटीओ, पोस्ट, त्याच बरोबर विमा, वित्तीय संस्था, यांची वसुली प्रकरणे सुध्दा लोक अदालत मध्ये ठेवली जात आहेत.

कायद्यातील तरतुदीनुसार प्री लिटीगेशन दाखल करताना सर्व कागदपत्रे संबंधितास देणे बंधनकारक आहे. ज्यांच्या विरुद्ध प्रकरण दाखल केले आहे त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर त्या प्रकरणात तडजोड झाली पाहिजे. असे असताना वाहतूक पोलीसांकडून ई चलन द्वारे दाखल झालेले खटले लोक अदालत मध्ये ठेवली जात आहेत. केवळ न्यायालयाची नोटीस म्हणून अनेक लोक अदालत मध्ये येवून तडजोड प्रक्रिये विना केवळ भिती पोटी दंड भरत आहेत. लोक अदालत ही संकल्पना उभय पक्षांमध्ये पंचंनी मध्यस्थी करून तडजोड द्वारे मिटवणे हे भारतीय राज्यघटनेला व कायद्याला अभिप्रेत आहे. केवळ लोक अदालत मध्ये मोठ्या संख्येने प्रकरणे निकाली काढत आहोत यासाठी वाहतूक पोलीस,

वित्तीय संस्था, टेलीकॉम कंपन्या, आरटीओ यांची नियमबाह्य व बेकायदेशीर वसुली प्रकरणे प्री लिटीगेशन च्या माध्यमातून लोक अदालत मध्ये ठेवली जात आहेत व उघड उघड नियमबाह्य, बेकायदेशीर वसुलीचे लोक अदालत केंद्र बनले आहे. लोक अदालत मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणात तडजोडी द्वारे निपटारा होणे या पवित्र भुमिकेच्या विसंगत लोक अदालतच्या संकल्पनेचा होत असलेला गैरवापर थांबणे हे निकोप न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने गरजेचे आहे. तरी लोक अदालत मधील प्री लिटीगेशनची नोटीस आल्यास त्याची भिती न बाळगता संबंधित वसुली ही कायदेशीर व मुदतीच्या आत आहे का

याची खातरजमा स्वतः अथवा विधी जाणकारांकडून करून घ्यावी एवढेच नाही तर जनतेने गैर प्रकाराविरूध्द आवाज उठवावा, प्रसंगी बहिष्कार टाकावा. लोक अदालत हे तडजोडीचे माध्यम असावे परंतु बेकायदेशीर वसुलीचे केंद्र बनु नये असे परिपत्रक विधी जागृती अभियानचे ॲड. उदय गवारे, ॲड. विजय जाधव, ॲड. धनंजय भिसे, ॲड. गणेश यादव, ॲड. राजेश खटके, ॲड. धनराज झाडके, ॲंड. भगवान साळुंखे, ॲड. सुमीत खंडागळे, ॲड. श्रीनिवास मंगलगे, ॲड. योगेश शिंदे, ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. जैनू शेख,ॲड. सुशील सोमवंशी, ॲड. सैफुद्दीन कोतवाल, ॲड.एस ओ खान, ॲड. जयपाल भोसले, ॲड. महादेव चापुले यांनी प्रसिद्ध केले आहे .

Most Popular

To Top