महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – राज्यातील कोविड-19 लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी काल रात्री राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सविस्तर चर्चा केली. अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या.
या कवच कुंडल अभियानाबाबत माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान हे मिशन कवच कुंडल अभियान राबवले जाईल. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत देशभरात 100 कोटी नागरिकांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून भरीव योगदान दिले जावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. कवच कुंडल अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी महसूल, ग्राम विकास, महिला व बाल विकास, शिक्षण, नगर विकास अशा विविध विभागांचा सहभाग घेतला जाणार आहे. अभियानासाठी पुरेशा लस उपलब्ध आहेत. सध्या राज्याकडे 75 लाख लस उपलब्ध आहेत. आणखी 25 लाख लस उपलब्ध होणार आहेत. सिरींज आदी अनुषंगिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
राज्यातील सव्वा नऊ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 6 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून आणखी सव्वातीन कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे. अभियानाच्या कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा उद्देश आहे. सध्या पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे 65 टक्के तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण साधारणपणे टक्के आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी या अभियानात समाजातील विविध घटकांचा सहभाग घेतला जाणार आहे. त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतला जाणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
कोविडमुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सुमारे 1 लाख 40 हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी एसडीआरएफ मधून सुमारे 700 कोटी रुपयांचे तरतूद केली जाणार आहे. यासाठी पोर्टलवर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना माहिती भरावी लागेल. त्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील. असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
