महाराष्ट्र खाकी (औसा) – महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले. पण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करणारे म्हणून एकमेव देवेंद्र फडणवीस झाले. आज त्याचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री असताना त्याचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले आणि देवेंद्र फडणवीसांचे सर्वात आवडते, विश्वासू असलेले औसा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या लाडक्या नेत्याला आपल्या लेखणीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिमन्यू पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा साध्यच्या काळातील राजकीय इतिहास आणि पुढील विकास कामे आपल्या लेखणीतून मांडला आहे.
भाऊ, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शतायुषी व्हा!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष विरोधी पक्षनेते, माझे राजकीय गुरु तथा मार्गदर्शक मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आणि त्यांच्या मनातील सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्याचे बळ आपणास मिळो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. प्रभू श्रीरामांची मर्यादा, हनुमानाची ताकद, चाणक्याची बुद्धी आणि कर्णाचे दातृत्व आपल्या ठायी कायम नांदो याच सदिच्छा.
भाऊ, जनतेनं आपल्याला स्पष्ट जनादेश दिलेला असताना नव्या राजकीय सोयरिकीमुळे विरोधी पक्षात बसावे लागलेले असतानाही आपल्या मनात किंचितही न डोकावलेली कटुता, विरोधी पक्षात असतानाही संकटकाळात सबंध महाराष्ट्राचा दौरा करून सर्वसामान्यांना व प्रशासनाला विश्वास देणारी आपली प्रामाणिक तळमळ, छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करण्याची आपली दृढ कटिबद्धता, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतानाची आपली शुद्ध नीतिमत्ता, ओबीसींचे आरक्षण परत मिळवण्यासाठी आपण करत असलेला निर्णायक संघर्ष, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठीची आपली धडपड, थेट कोकणातून पाणी वळते करून मराठवाड्यात आणण्याची आपली कल्पकता, प्रत्येक विषयाचा असलेला आपला गाढा अभ्यास, दीर्घ पण निष्कलंक राजकीय कारकीर्द, लहानातील लहान गोष्ट अचूकपणे टिपणारी आपली सूक्ष्म निरीक्षणशक्ती, प्रशासनावरची आपली भक्कम पकड, नवमहाराष्ट्र निर्मितीची आपली तीव्र इच्छाशक्ती आणि त्यासाठी झोकून देऊन प्रचंड कष्ट करण्याची तयारी वाखाणण्याजोगी आहे. तुमचे विचार आणि अनुकरणीय आचरण ही माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. भाऊ, सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी आणि अंत्योदयासाठी आपण करत असलेल्या संघर्षात भारतीय जनता पक्षाचा एक ना एक कार्यकर्ता भक्कमपणे आपल्या सोबत उभा आहे. भाऊ, पुनश्च एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा, शतायुषी व्हा!